Mon, Aug 19, 2019 17:56होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंदा तालुक्यात अवकाळीचा फटका

श्रीगोंदा तालुक्यात अवकाळीचा फटका

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:56PMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव, ढोरजा, चिखलठावाडी, काष्टी, अजनुज सह  15 गावांना सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामध्ये 10 जण जखमी झाले असून, चार जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तीनशेच्या आसपास  घरांची पडझड झाली आहे.  18 शेतकर्‍यांचे पॉलिहाऊसचे शेड, एका शेतकर्‍यांचे कुक्कुटपालन शेड उडून गेले. डाळिंबाच्या बागा तसेच मोठमोठी झाडे जमिनदोस्त झाली आहेत. विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 

या अस्मानीने 2 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी तालुका कृषी अधिकारी व कामगार तलाठी यांना घरांची पडझड व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. 

त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा दिवसभर पंचनामा कामात व्यस्त होती. आ. राहुल जगताप यांनी चांडगावला भेट देऊन पाहणी केली.  नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. रवींद्र म्हस्के यांनी चांडगाव येथील नुकसानीची माहिती दिली. भाऊसाहेब ढोरजकर, छाया ढोरजकर ,विजया ढोरजकर, प्रवीण ढोरजकर, राणी ढोरजकर (सर्व रा. ढोरजा),  चांडगावचे पोलिस पाटील प्रकाश घोडके, वैशाली चव्हाण, गयाबाई चव्हाण (रा. चांडगाव), सुलतान अन्सारी व महमंद सुलतान ( रा. अजनुज) हे नागरिक जखमी झाले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील 18 शेतकर्‍यांनी बँकांचे कर्ज काढून पॉलिहाऊस उभे करून शेती फुलविली. पण एका वादळात पॉलिहाऊसची शेती नष्ट झाली. 18 शेतकर्‍यांचे सुमारे एक कोटीचे नुकसान झाले आहे. चंदू वाजे, अरविंद कापसे, दिनेश फडणवीस (श्रीगोंदा), तात्या लखे, डॉ खंडू बडवे, स्वप्नील रोडे, संतोष रोडे, लाळगे गुरूजी, भाऊसाहेब बाबर (रा. लिंपणगाव)  बापुराव निंभोरे (घोटवी), दत्तात्रय लगड (कोळगाव), गणेश मैंद, युवराज चिखलठाणे (कणसेवाडी), विठ्ठल शिंदे (घोडेगाव) यांच्या पॉलिहाऊसचे नुकसान झाले.

तालुक्यातील 15 गावांतील गोरगरिबांच्या घरांचे पत्रे उडून गेले. चांडगाव मध्ये समाजमंदिर व शाळेचे पत्रे उडून गेले आहेत. आढळगावचे बाळासाहेब पठाडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काष्टीत 80 घरे, गार 40, सांगवी 35, चांडगाव 60, ढोरजा 2, मुंढेकरवाडी 20, कणसेवाडी 14, चिखलठावाडी 15, वेळू  7, चोराचीवाडी भिंगाण 4, घोडेगाव 4, अजनुज 31, आनंदवाडी 32, अशा जवळपास तीनशेहून अधिक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तालुक्यातील  50 शेतकर्‍यांच्या डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भीमराव रसाळ यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चारपाच वर्षांत शासनाने एक रुपयाही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे नुसता पंचनामे करण्याचा फार्स करू नये, अशी भावना अरविंद कापसे यांनी व्यक्त केली आहे.