Sat, Mar 23, 2019 02:16होमपेज › Ahamadnagar › सदस्यच करणार बोंबाबोंब!

सदस्यच करणार बोंबाबोंब!

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 06 2018 12:21AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे सदस्यच अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. मंगळवारी आठवड्यातील एक दिवस तरी अधिकारी-पदाधिकारी जनतेसाठी मुख्यालयात उपलब्द्ध असावेत, अशी मागणी सदस्यांनी केली असून, येत्या मंगळवारी अधिकारी-पदाधिकारी त्यांच्या दालनात नसल्यास बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, हर्षदा काकडे, शरद झोडगे, काशिनाथ दाते, पंचायत समिती सभापती रामदास भोर आदींनी दिला आहे.

वरील सर्व सदस्य व सभापती हे काल (दि. 5) जिल्हा परिषदेत कामानिमित्त आले होते. मात्र अपवाद वगळता अनेक अधिकारी त्यांच्या दालनात आढळून आले नाही. तसेच पदाधिकारीही आलेले नव्हते. वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसह विविध समिती सभांमध्ये यापूर्वी अनेकदा अधिकार्‍यांनी आठवड्यातील एक दिवस त्यांच्या दालनात थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र व्हिडीओ कॉन्फरसिंग, कामांची पाहणी, दफ्तर तपासणी आदींच्या नावाखाली अनेकदा अधिकारी कार्यालयातून गायब असतात. ग्रामीण भागातून नागरिक त्यांच्या समस्या, तक्रारी घेऊन पदाधिकार्‍यांच्या भेटीसाठी येत असतात. मात्र अधिकार्‍यांसह पदाधिकार्‍यांचीही वेळ निश्चित केलेली नसल्याने नागरिकांना काम न होता परतावे लागते. यात त्यांचा वेळ व पैसाही वाया जातो.त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी हे आठवड्यातील एक दिवस मुख्यालयातच थांबावे अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. विविध सभांमध्ये निर्णय होऊनही त्याचे पालन होत नसल्याने सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पालन होणार नसले तर ठराव घ्यायचेच कशाला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

मंगळवारचा प्रघात मोडला

पूर्वी जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे दर मंगळवारी जिल्हा परिषदेत येत असत. यादिवशी सर्वच पदाधिकारी येत असल्याने अधिकारीही पूर्ण वेळ थांबून राहत. मात्र गेल्या दीड वर्षांपासून मंगळवारचा हा प्रघात मोडीस निघाला. यापूर्वीचे सर्व पदाधिकारी हे मंगळवारी मुख्यालयात येत असतांना याच पदाधिकार्‍यांनी हा प्रघात का मोडला? असा सवालही जिल्हा परिषद सदस्य विचारू लागले आहेत.