Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Ahamadnagar › कौटुंबिक वादातून पत्नीचा केला खून

कौटुंबिक वादातून पत्नीचा केला खून

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:19PMनगर : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा नाक, तोंड दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह गावातील एका शेततळ्यातून टाकून आत्महत्येचा बनाव केला. नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे रविवारी (दि. 8) ही घटना घडली होती. दुसर्‍या दिवशी मृतदेह सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बुधवारी (दि. 12) एमआयडीसी पोलिस ठाण्यात खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पती ज्ञानेश्‍वर कानिफनाथ वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) यास अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनीता ज्ञानेश्‍वर वाघ हे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सात वर्षांपूर्वी सुनीता यांचे ज्ञानेश्‍वर वाघा याच्याशी लग्न झाले होते. काही दिवसांपासून कौटुंबिक वादातून पती-पत्नीत वाद होत होते. 20 मार्च 2018 रोजी सुनीता यांनी बंधू रवींद्र भगत यांना फोन करून सासरी बोलावून घेतले. त्यावेळी भावासोबत त्या माहेरी आल्या. ‘पती ज्ञानेश्‍वर छोट्या-छोट्या कारणातून वाद घालून नेहमी मारहाण करतो. सततच्या त्रासाला कंटाळले आहे’, असे सुनीता यांनी माहेरी सांगितले. माहेरच्या लोकांनी समजूत घातल्यानंतर चार दिवसांनी त्या पुन्हा सासरी परतल्या.

रविवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता बहिणीचे सासरे कानिफनाथ यांनी फोन करून भगत यांना फोनकरून बहीण सुनीता व मेहुणा ज्ञानेश्‍वर यांच्यात घरगुती कारणातून वाद झाले. त्यानंतर ती कोठेतरी निघून गेली आहे, असे सांगितले. तसेच माहेरी परतली का, अशी विचारणा केली. हा फोन आल्यावर सुनीता यांच्या माहेरच्या लोकांनी शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. सोमवारी (दि. 9) सकाळी एकाने फोन करून रवींद्र भगत यांना सुनीता यांचा मृतदेह शेततळ्यात असल्याचे सांगितले. घटनास्थळी जाऊन खात्री घेतल्यानंतर भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला खबर दिली. मृत्यूबाबत संशय आल्याने मृतदेहाची औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. उत्तरीय तपासणीत सुनीता यांचा मृत्यू नाक व तोंड दाबल्याने गुदमरून झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यावरून मयत सुनीता यांचे बंधू रवींद्र गवाजी भगत (रा. भगतवस्ती, शेंडी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ज्ञानेश्‍वर वाघ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला काल (दि. 12) अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरे हे करीत आहेत. 

Tags : Ahmednagar, Wifes murder, family dispute,