Mon, Aug 19, 2019 17:33होमपेज › Ahamadnagar › जुगारासाठी पत्नीवर चाकूने हल्ला

जुगारासाठी पत्नीवर चाकूने हल्ला

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 10:22PMपारनेर : प्रतिनिधी

जुगाराच्या आहारी गेलेल्या मनोरुग्ण पतीने मणक्याच्या आजाराने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करीत एअर गनमथून गोळ्या झाडल्या. ही घटना पारनेर तालुक्यातील जामगाव येथे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीस नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पारनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. 

नवनाथ पोपट काळे (वय 48, रा. जामगाव) हा गेल्या अनेक दिवसांपासून जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नी वैशाली (वय 45) यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत असे. नवनाथच्या वागण्यास कंटाळून पत्नी वैशाली यांनी मुलांच्या मदतीने लाह्या विक्री सुरू केली. त्यातच वैशाली यांना मणक्याचा आजार जडल्याने त्या काही दिवसांपासून अंथरुणास खिळल्या होत्या. 

काल सकाळी मुलगा निहाल यास चाळण हवी होती. निहाल याने घरातील कपाटाचे कुलूप तोडून चाळणी घेतली. त्याचा राग आल्याने अंथरुणावर पडलेल्या वैशाली यांच्या पायावर बसून नवनाथ याने त्यांच्या पोटावर, तसेच छातीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरूवात केली. त्यात त्या रक्‍तबंबाळ होऊन बेशुद्धा झाल्या. त्यानंतर नवनाथने एअर गनमधून डोक्यावर छर्र्‍याच्या गोळ्या झाडल्या.

हल्ल्यानंतर नवनाथ याने तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. परंतु आजूबाजूच्या लोकांनी तोपर्यंत पोलिसांना माहिती कळविल्यामुळे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे फौजफाटयासह तात्काळ जामगावमध्ये पोहचले होते.  पसार होण्याच्या तयारीत असलेल्या नवनाथ यास रक्‍ताने माखलेल्या कपड्यांसह त्यांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्हयात वापरण्यात आलेला चाकू, तसेच एअर हस्तगत करण्यात आली. दरम्यान, हल्ल्यानंतर वैशाली यांना सुरूवातीस भाळवणी येथे व त्यानंतर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या बेशुद्धावस्थेत असल्याने पोलिसांना त्यांना जबाब नोंदविता आला नाही. वैशाली यांच्या पोटावर, छातीवर तसेच डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. सायंकाळी नवनाथ याची मुलगी नम्रता हिने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा प्रयत्न तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags : nagar, nagar news, Wifes knife attack, gambling,