होमपेज › Ahamadnagar › चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:14AMनगर : प्रतिनिधी

सासूरवाडीत राहणार्‍या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून व उशीने तोंड दाबून निर्घृण खून केला. विळद पाण्याच्या टाकीजवळ काल (दि. 6) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर पती प्रवीण ऊर्फ अप्पा गोपाळ गडाप्पे (वय 36) हा सकाळी सहा वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याला शुक्रवारपर्यंत (दि. 11) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

स्वाती प्रवीण गडाप्पे (वय 33) हे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आरोपी प्रवीण हा पुणे येथील रहिवाशी आहे. परंतु, सुमारे 8 महिन्यांपूसन तो पत्नी स्वाती यांच्या समवेत विळद पाण्याच्या टाकीजवळील गवळीवाड्यातील सासूरवाडीत राहतो. सासर्‍यांच्या मालकीच्या घरात सासू, सासरा व मेहुण्यांपासून वेगळ्या खोलीत स्वतःच्या कुटुंबियांसह राहतो. प्रवीण हा एमआयडीसीतील कंपनीत काम करून उपजिविका भागवितो. त्याला दोन मुली आहेत.

सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी प्रवीण याचे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो पत्नीशी वारंवार भांडण करीत होता. सासूरवाडीच्या लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटविला होता. मात्र, तरीही प्रवीणच्या डोक्यातील राग कमी झालेला नव्हता. तो पत्नीला ‘तुला मारून टाकेन’, असे वारंवार म्हणत होता.

रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास प्रवीण याने घरासमोरच्या ओट्यावर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा टाकला. त्यानंतर उशीने तोंड दाबून खून केला. अंथरुणातच स्वाती यांचा मृत्यू झाला. खुनानंतर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रवीण गडाप्पे हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेला. ठाणे अंमलदाराकडे जाऊन त्याने स्वतः केलेल्या खुनाची कबुली दिली व ‘मला अटक करा’, असे म्हणला. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण गडाप्पे याला ताब्यात घेतले. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पोलिस फौजफाटा तातडीने विळद पाण्याच्या टाकीजवळील गवळीवाड्यात दाखल झाला. 

पोलिसांचे पथक स्वाती यांच्या माहेरी गेले. तेथे नातेवाईकांना झोपेतून उठविले. ‘प्रवीण गडाप्पे नावाचा इसम पोलिस ठाण्यात आला असून, तो पत्नीचा खून केला’, असे म्हणत असल्याचे सांगितले. त्यानंतर मयत स्वाती यांचे बंधू कैलास हातरुणकर हे बहीण राहत असलेल्या घराकडे गेले. त्यावेळी घराच्या समोरील ओट्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्वाती यांचा मृतदेह दिसला. तोंड दाबण्यासाठी वापरलेली उशी रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेहाच्या बाजूला होती. तसेच स्वाती यांच्या डोक्याखाली असलेली उशीही रक्ताने भरलेली होती. त्यानंततर मेहुणे कैलास व इतर नातेवाईक एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी पोलिस ठाण्यातही प्रवीण याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. 

रविवारी सकाळी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया या वरिष्ठ अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट दिली. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कैलास लक्ष्मण हातरुणकर (रा. गवळीवाडा, विळद पाण्याच्या टाकीजवळ, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून प्रवीण गडाप्पे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.