Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Ahamadnagar › कुर्‍हाडीने घाव घालून पत्नी व मुलीची हत्या

कुर्‍हाडीने घाव घालून पत्नी व मुलीची हत्या

Published On: Mar 07 2018 1:38AM | Last Updated: Mar 07 2018 1:37AMशिर्डी : प्रतिनिधी

पत्नीने शरीरसंबंधास वारंवार नकार दिल्याने गवंडी काम करणार्‍या पतीने रागाच्या भरात पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीची कुर्‍हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. सासूच्या डोक्यातही कुर्‍हाडीने घाव घातल्याने त्याही गंभीर जखमी असून, त्यांना शिर्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पत्नी व मुलीच्या हत्येनंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाला. त्यास अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा व जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काल रंगपंचमीच्या दिवशी शहराच्या खडकी प्रभागात सकाळी 7 वाजता ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. गणेश भीमराव खरात (30, रा. खडकी ता. कोपरगाव जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे. तर मृतांत त्याची पत्नी सुकेशिनी गणेश खरात (21) व तीन महिन्यांची मुलगी सोनिया ऊर्फ दीदी हिचा समावेश आहे.  या घटनेत त्याची तीन व दोन वर्षांची मुले मात्र दुसरीकडे झोपण्यास गेल्यामुळे वाचली आहेत.

याबाबत शिर्डी उपविभागाचे पोलिस अधिकारी डॉ. सागर पाटील व शहर पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी गणेश खरात हा गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. त्याची पत्नी सुकेशिनी हिचे तीन महिन्यांपूर्वी बाळंतपण झाले होते. एक महिन्यापूर्वी तिची कुटुंब नियोजनाची शस्रक्रिया झाली होती. गणेश हा तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करीत होता. मात्र, ती त्यास नकार देत असे. त्याचा राग त्याच्या डोक्यात होता. गणेशला समजून सांगण्यासाठी होमगार्ड असलेली त्याची सासू रुख्मिणी सुभाष गवई (रा. कोल्हारा, चिखली, जि.बुलढाणा) या कोपरगावी आल्या होत्या. मुलीस व नातवांना त्या काल माहेरी घेऊन जाणार होत्या. त्याच्या आतच सकाळी उठून गणेशने कुर्‍हाडीने पत्नी व मुलीच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. 

तो घरातून बाहेर आला त्यावेळेस आरोपी गणेशची आई बेबीताई हिने त्याच्या हातात कुर्‍हाड पाहून घरात धाव घेतली. आतमध्ये सून व नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तिने व सासूने आरडाओरडा केला. तेव्हा शेजारचे, आसपासचे लोक जमा झाले. त्यावेळी आरोपीने सासूच्याही डोक्यात कुर्‍हाडीने वार केला. त्यानंतर आरोपी गणेश याने घराला कुलूप लावले व स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली.

मी केलेल्या कृत्याचा मला कुठलाही पश्‍चाताप नाही, असेही हा आरोपी पोलिसांशी बोलताना म्हणाला, असे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.दरम्यान, या हत्याकांडातील रक्ताळलेळी कुर्‍हाड व कपडे  पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहेत. नगर येथून रक्षा नावाचे श्‍वान पथक व पोलिस उपनिरीक्षक एस.आर. बावळे, ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. धुमाळ, एन.के. काळे घटनास्थळी पोहचले. 

सासू रुख्मिणी गवई यांच्यावर शिर्डी येथे उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश खरात विरोधात खुनाचा व जीवे ठार मारण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक जाधव हे करीत आहेत. 
सुकेशिनी व सोनिया यांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी उशिरा शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.