Mon, Apr 22, 2019 04:28होमपेज › Ahamadnagar › भाजपवर घूमजावची वेळ का आली?

भाजपवर घूमजावची वेळ का आली?

Published On: Aug 14 2018 1:11AM | Last Updated: Aug 13 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

उपमहापौर निवडणूक होऊन गेल्यावर छिंदमला मी राजीनामा दिल्याचा साक्षात्कार झाला. तसाच साक्षात्कार आता भाजप खासदारांनाही झालाय. छिंदमचे वक्‍तव्य अंगलट आल्यानंतर माध्यमांसमोर उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणार्‍या व राजीनामा महापालिकेकडे पाठविणार्‍या खा.दिलीप गांधी यांच्यावर घूमजाव करण्याची वेळ का आली? असा सवाल करत छिंदमला साजेशी भूमिका घेणार्‍या खासदारांची आजही छिंदमला छुपी साथ असल्याचे स्पष्ट होत असल्याच्या शब्दांत शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्याप्रकरणी भाजपातून बडतर्फ झालेल्या श्रीपाद छिंदमच्या उपमहापौर पदाच्या राजीनाम्याबाबत खासदारांच्या वक्‍तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने सोमवारी (दि.13) पत्रकार परिषद घेऊन भाजप व खासदारांवर टीकेची झोड उठविली आहे.

शिवरायांचा अपमान करणार्‍या छिंदमला आजही खासदारांकडून साथ दिली जात असल्याचा आरोप शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे यांनी केला आहे. छिंदमच्या वक्‍तव्यानंतर खासदारांनी तात्काळ पत्रकार परिषद घेवून छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले होते. त्याच्या व्हिडीओ क्‍लिप सर्वांकडे आहेत. त्यानंतर गांधी यांच्या कार्यकर्त्यांनीच राजीनामा महापालिकेत पाठविला. त्यानंतर नवीन उपमहापौरांची निवड झाली. यात भाजपने प्रायश्‍चित्तही घेतले. उपमहापौर निवडणूक होईपर्यंत याला कुणीही हरकत घेतली नाही. आता खासदारांकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला नसल्याचे खोेटे वक्‍तव्य केले जात आहेत. या वक्‍तव्याप्रमाणेच त्यांचे प्रायश्‍चित्तही खोटेच होते का? गांधींवर घूमजाव करण्याची वेळ का आली? असा सवाल संभाजी कदम यांनी केला आहे. या वक्‍तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, याची किंमत खासदारांना मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरप्रमुख सातपुते म्हणाले, भाजप व त्यांच्या खासदाराचे शिवाजी महाराजांप्रती असलेले बेगडी प्रेम स्पष्ट झाले आहे. आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. त्यांची बदनामी सहन करणार नाही. निवडणूक काळात छत्रपतींचा आशीर्वाद घेवून राजकारण कुणी केले? हे सगळ्या जनतेने पाहिले. मुळातच छिंदम हा खासदारांचा मानसपुत्र असून, महापालिकेत येण्यासाठी त्याला बंदोबस्त मिळावा, यासाठी खासदार गांधी यांनीच प्रयत्न केल्याचा आरोपही सातपुते यांनी केला आहे.

मनपाचे ठराव खासदारच लिहिणार का?

उड्डाणपूल प्रश्‍नी महासभेच्या ठरावाबाबत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर शिवसेनेने खा.दिलीप गांधी व सुवेंद्र गांधींवर उपरोधिक टीका केली आहे. महासभेत उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचा खर्च उचलण्याचा ठराव झालेला आहे. शासन परित्रकानुसार जो खर्च करावा लागेल तो मनपा करणार आहे. तसाच ठराव अंतिम केला जाणार आहे. अद्याप ठराव रेकॉर्डवरच आलेला नाही. त्यामुळे खासदारांनी किंवा सुवेंद्र गांधींनी स्वतःच महापालिकेचे ठराव लिहायला सुरुवात केलीय का? असा सवाल करत नागरीकांची दिशाभूल करुन शिवसेनेची बदनामी करण्याचा प्रकार भाजपकडून सुरु असल्याचे संभाजी कदम यांनी म्हटले आहे.