होमपेज › Ahamadnagar › दोन लाखांची लाच घेताना पुरवठा अधिकारी जाळ्यात

दोन लाखांची लाच घेताना पुरवठा अधिकारी जाळ्यात

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:28AMनगर : प्रतिनिधी

रेशन दुकानदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार नितीन गर्जे यास रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चर्चच्या गेटसमोरील रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल (दि. 19) सायंकाळी ही कारवाई केली. याबाबत समजलेली माहिती अशी की, गर्जे याने भिंगार येथील एका रेशन दुकानासाठी मालवाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. हा टेम्पो गर्जे यांनी सोडून दिला होता. टेम्पोवर कारवाई न करणे व रेशन दुकानावर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात मासिक हप्ता 50 हजार याप्रमाणे आतापर्यंतचे एकूण 8 लाख रुपये लाच म्हणून मागितले. त्यातील 2 लाख रुपये गुरुवारी (दि. 19) घेण्याचे ठरले होते. 

याप्रकरणी सदर दुकानदाराच्या भावाने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची ‘एसीबी’ने पडताळणी केली. त्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी दुपारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात सापळा रचला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चर्चच्या गेटसमोरील रस्त्यावर तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार नितीन गर्जे यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, कर्मचारी तन्वीर शेख, दत्तात्रय बेरड, सतीश जोशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गर्जे यास पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात नितीन गर्जे याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांकडून अटकेची कार्यवाही करण्यात आली. गर्जे यास शुक्रवारी (दि. 20) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.