पारनेर : प्रतिनिधी
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील गव्हाची परस्पर विक्री करताना रंगेहात पकडलेला स्वस्त धान्य दुकानदार, तसेच तो खरेदी करणार्या दोघांविरोधात चार दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे वडनेर बुद्रुक परिसरात हो चर्चेचा विषय ठरला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, वडनेर बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर याने 7 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता स्वस्त धान्य दुकान उघडून त्यातील गव्हाचे तीन कट्टेे रामदास मारुती कापसे (रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) तसेच भाऊसाहेब विठ्ठल गोरडे (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना काळ्या बाजाराने विकताना दत्तात्रय मोहन पवार यांनी रंगेहात पकडले. पवार यांनी तिघांकडे विचारणा केली असता,ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. संशय बळावल्याने पवार यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर निघोज दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन तीन गव्हाचे कट्टे, एक दुचाकीसह कापसे व गोरडे यांना ताब्यात घेतले.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती दिल्यानंतर हा गुन्हा महसूल विभागाच्या पुरवठा विभागाशी सबंधीत असल्याने पुरवठा निरीक्षकांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर या दोघांना दूरक्षेत्रात हजेरी लावण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आले. पारनेर पोलिसांनी यासंदर्भात अहवाल पाठविल्यानंतर महसूल विभागाकडून मात्र त्यास चार दिवस उलटूनही प्रतिसाद मिळालेला नाही. यासंदर्भात दत्ता पवार यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली असून, महसूल विभाग गुन्हा दाखल करण्याबाबत करीत असलेल्या टाळाटाळीबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुरवठा विभागाकडून फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पोलिस प्रशासनाची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.