Thu, Jul 18, 2019 11:02होमपेज › Ahamadnagar › वाळूउपशाची चौकशी परंतु बेकायदा बंधार्‍यांचे काय?

वाळूउपशाची चौकशी परंतु बेकायदा बंधार्‍यांचे काय?

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 10:12PMपारनेर : विजय वाघमारे

जवळे येथील सरस्वती ओढ्यातील वाळू उपशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी ओढ्याच्या पात्रात केलेले उपोषण प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे घेतले. दाणेज यांच्या आश्‍वासनाप्रमाणे वाळू उपशाची चौकशी होणार आहे, परंतु ग्रामस्थांनी बेकायदेशीररित्या बांधून घेतलेल्या बंधार्‍याचे काय हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. वाळूउपशाची चौकशी करताना त्यातूनच बांधून घेतलेल्या बंधार्‍यांकडे डोळेझाक करायची हा ग्रामस्थांचा दुटप्पीपणा या निमित्ताने पुढे आला आहे. 

कुकडी कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतर ते पाणी साठविण्यासाठी बखाडी येथे बंधारा बांधण्याची शेतकर्‍यांची अनेक दिवसांची मागणी होती. परंतु कालवा क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी शासन निधी देत नसल्याने ही मागणी मान्य होत नव्हती. अर्थात पुणे जिल्ह्यात अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर बंधारे बांधून त्यात कुकडीच्या आवर्तनाचे पाणी साठविले जाते. तशाच पद्धतीने जवळ्याच्या नागरिकांनी बंधारा बांधून पाण्याची सोय करून घेतली असली तरी बंधारा बांधून झाल्यानंतर मात्र याच बंधार्‍यासाठी उपसण्यात आलेल्या वाळूची मात्र गैरसोय दिसू लागली हे विशेष!

सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी उपशाविरोधात आवाज उठविला व ओढ्यात उपोषण सुरू केले. खरे तर पहिल्या दिवशी ग्रामस्थांनी त्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरविली. परंतु दुसर्‍या दिवशी बंधारा बांधून घेण्यासाठी ग्रामस्थांनी वाळूतस्करीस मूक संमती देऊन प्रतिसरकारची चुणूक दाखविल्याचे वास्तव ‘पुढारी’ने वाचकांपुढे मांडल्यानंतर मात्र ग्रामस्थांना घावटेंच्या आंदोलनाची आस्था वाटू लागली. महसूल विभागाच्या मालकीचा वाळू उपसा तसेच ओढ्यावर बांधण्यात आलेला बेकायदेशीर बंधारा या दोन्हीही  गोष्टी गैरच. परंतु बंधार्‍याचा विषय डोळ्याआड करून केवळ वाळू उत्खननाविरोधात आवाज उठविण्यासाठी घावटे यांच्यावर निर्माण करण्यात आलेला दबाव मात्र  निश्‍चितच समर्थनार्थ नाही. 

घावटे यांनी आजवर दारूबंदी, पारनेर कारखान्याची बेकायदेशीर विक्री, अवैध व्यवासाय याविरोधात अनेकदा आवाज उठविला. त्यात त्यांची प्रामाणिक भूमिका वेळोवेळी अधोरेखित झाली. सरस्वती ओढ्यातील वाळूउपशाबाबत मात्र ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. बंधार्‍याचा विषय पुढे रेटावा तर ग्रामस्थांचा रोष व त्याशिवाय वाळूउपशाच्या चौकशीचा आग्रह धरावा तर भूमिकेवर संशय अशा कात्रीत घावटे यांचे आंदोलन सापडले आहे. 

सरस्वती ओढ्यातून होणारा वाळू उपसा नेहमीचाच. ग्रामस्थांनी मूक संमती देउन वाळूउपशास सुरूवात झाली व त्या बरोबरच बंधार्‍याच्या कामालाही. खरे तर त्याच वेळी त्याविरोधात आवाज उठविण्यात आला असता तर प्रशासनास वाळूउपशा बरोबरच बंधार्‍याचेही काम थांबविता आले असते. आता तर जवळपास सर्वच वाळूचा उपसा होउन गेलाय, बंधाराही बांधून तयार झालाय. प्रांताधिका-यांची चौकशी समिती वाळूउत्खननामुळे झालेल्या खड्ड्यांचे मोजमाप करण्यासाठी जाईल त्यावेळी ओढ्याच्या बर्‍याच भागात पाणी असल्याने तेथे मोजमाप करता येणार नाही. 

मोठा पाऊस झाला तर बंधार्‍यामुळे सर्वच ओढा पाण्याखाली जाईल. शिवाय पाणी ओसरल्यानंतर उत्खनन केलेला भाग वाळू किंवा मातीने भरलेला असेल. अशा स्थितीत उत्खननाची चौकशी हा केवळ फार्स ठरण्याची चिन्हे आहेत.  तशाही स्थितीत पंचनामे करून मोजमापे घेतली तर पंचनाम्यावर पंच म्हणून सह्या करण्यासाठी कोण पुढे येणार? वाळूचे उत्खनन ज्यांनी केले त्यांचे नावे कोण सांगणार? हा देखील प्रश्‍न आहे. घावटे यांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदार भारती सागरे यांनी पंचनामा करण्यासाठी  महसूलच्या पथकाला घेऊन घटनास्थळी भेट दिली होती. परंतु तेथेही पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी कोणीही ग्रामस्थ पुढे आला नाही किंवा हा उपसा कोणी केला त्यांची नावे घेण्यासही कोणी धजावले नाही. अशा स्थितीत पंचनामे करून अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करून पदरी काय पडणार? पोलिस ठाण्याच्या यादीत अवैध वाळू उपशाच्या एका गुन्ह्यात वाढ होईल इतकेच. एकंदरीत एकीकडे बेकायदा बंधारा बांधून घ्यायचा व त्यासाठी केलेल्या वाळू उपशाविरोधात कारवाईची मागणी करायची हा जवळे ग्रामस्थांचा दुटप्पीपणा या निमित्ताने पुढे आला आहे.