Sun, Apr 21, 2019 04:29होमपेज › Ahamadnagar › वसुलीचा कामांना फायदा काय?

वसुलीचा कामांना फायदा काय?

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 10:16PMनगर : प्रतिनिधी

गेल्या तीन-चार महिन्यांत 40 ते 45 कोटींची वसुली झाली आहे. यातून प्रशासकीय देणी देऊन भार कमी करणे गरजेचे आहेच. मात्र, यातून काही प्रमाणात विकासकामांना निधी उपलब्ध करुन देणेही गरजेचे आहे. कर भरणारे नागरिक जाब विचारत आहे. प्रशासनाने समतोल राखण्याची गरज असल्याचे सांगत, वसुलीतून छदामही दिला जात नसल्याने त्याचा विकासकामांना, नागरिकांना फायदा काय? अशी खंत महापौर सुरेखा कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केली.

शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, रस्ता पॅचिंग, नगरसेवकांच्या प्रभागातील किरकोळ कामे निधीअभावी रखडली आहेत. आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत आयुक्‍तांनी अंदाजपत्रकातील तरतुदी खुल्या करण्यास नकार दिला आहे. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत कोट्यवधी रूपयांची वसुली झाली असल्याने नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. प्रभागात नगरसेवक फिरत असतांना कर भरणारे नागरिक जाब विचारत आहेत. किरकोळ कामेही होत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

वसुली ठप्प झाल्यानंतर तत्कालीन आयुक्‍तांशी चर्चा करून शास्ती सवलत योजना राबविली. यातून चांगली वसुलीही झाली आहे. महापालिकेची थकीत देणी जास्त आहे. त्यातील महत्त्वाची प्रशासकीय देणी दिलीच पाहिजेत. मात्र, ती देत असतांना नागरिकांना दिलासा मिळेल, याचीही दक्षता प्रशासनाने घ्यायला हवी. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. आजपर्यंतच्या वसुलीतून किती निधी विकासकामांसाठी दिला? या वसुलीचा विकासकामांना, नागरिकांना फायदा काय? त्यांना सुविधा मिळणार नसतील, तर ते कर भरतील का? असे सवालही महापौर कदम यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या एककल्ली कारभाराबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांमधील असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे.