Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Ahamadnagar › ..कोणत्या गुन्ह्याची मला ही शिक्षा?

..कोणत्या गुन्ह्याची मला ही शिक्षा?

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMनगर : गणेश शेंडगे

अनैसर्गिक लैंगिक अत्याचारानंतर ‘त्या’ चिमुरडीच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्या जखमा कायमस्वरुपी तिच्या सोबतीला आहेत. मंगळवारी (दि. 7) अत्याचार करणार्‍या आरोपीला मरेपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा झाली. निकाल लागला, पण तिचे शरीर व मनावर झालेल्या जखमांचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला आहे. आयुष्यभर राहणार्‍या शरीरातील जखमा व आई-वडिलांशिवाय राहण्याची आलेली दुर्दैवी वेळ ही तिला झालेली शिक्षा पाहता ‘माझा गुन्हा काय’, हा प्रश्‍न तिला पडल्याशिवाय राहत नाही.

8 डिसेंबर 2016 ची सायंकाळ एका अडीच ते पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीचे आयुष्य बदलून टाकते. काहीही चूक नसताना तिला कायमस्वरुपीची शिक्षा देऊन जाते. बाळू बर्डे नावाचा नराधम त्या चिमुरडीच्या नशेबाज आई-वडीलांना किरकोळ खाऊचे आमिष दाखवितो अन् त्यांची नजर चुकवून तिचे अपहरण करतो. मुलगी गायब झाल्यानंतर तिचे आई-वडील तात्काळ रेल्वे पोलिस ठाण्यात जातात. मुलीला पळवून नेल्याचे सांगण्याचा प्रयत्न करतात. आई-वडील नशेबाज आहे म्हणून काय झाले? त्यात त्या चिमुरडीची काय चूक. पण तेथे नियुक्तीस असलेला पोलिस कर्मचारी त्यांना फोटो आणा, अशी बतावणी करून ाकलून देतो. त्यावेळी रेल्वे स्टेशन परिसरात तिचा शोध घेतला असता तर कदाचित तिच्यावर झालेला अत्याचार टळला असता. 

पोलिस ठाण्यातून हाकलून दिल्यानंतर ते दुसरीकडे नातेवाईकांकडे असलेला मुलीचा फोटो आणण्यासाठी गेले. दरम्यानच्या काळात शरीरात पशु संचारलेल्या बर्डेने तिच्यावर अतिशय अमानवगी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार करून वासना शमविली. तिच्या शरीराचे लचके तोडतो. तिच्यावर अशा ठिकाणी अत्याचार केला की तिच्या किंचाळ्या कोणालाही ऐकू येणार नाहीत. अत्याचारानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी कोतवाली पोलिसाां समजते. ते त्या चिमुरडीला तात्काळ ‘सिव्हिल’ हॉस्पिटलला दाखल करतात. तिला गंभीर दुखापत झाल्याने पुण्याला हलविण्यात आले. शरीरातील अनेक शिरा तुटल्या होत्या. अनेक अवयवांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे 1 डिसेंबर 2016 ते 17 मे 2017 दरम्यान तिच्यावर वेगवेगळ्या अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

नशीब बलत्त्वर म्हणून मृत्यूवर विजय मिळवून ती बचावली. मात्र, सुरुवातीला ‘ससून’ने डिस्चार्ज दिल्यानंतर तिला आई-वडील घेऊन नगरला आले. मनोधैर्य योजनेतून आर्थिक फायदा मिळणार म्हणून तिला रेल्वेे स्टेशन उड्डाणपुलाखाली घेऊन राहू लागले. गंभीर दुखापत असूनही तिच्या नशिबी, हे वेळ आली होती. ही बाब ‘पुढारी’ने उजेडात आणल्यानंतर काही सामाजिक संस्था व सरकारी यंत्रणाही मदतीसाठी सरसावली. पोलिसांच्या अहवालानंतर बालकल्याण समितीने तिला शिशुगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. तिथे ती आनंदात राहू लागली. मात्र, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरूच होते.

दुसरीकडे कुठलाही पुरावा नसताना नगर जिल्हा पोलिस अहोरात्र आरोपीचा शोध घेत होते. केवळ वर्णनावरून राज्यभरातील रेल्वे स्थानके व इतर ठिकाणी आरोपीचा शोध घेत होते. 22 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आरोपी नराधम बाळू बर्डे सापडला. पोलिसांनी सखोल तपास करून बर्डे याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. घटनेस पावणेदोन वर्षे ओलांडल्यानंतर खटल्याचा निकाल लागला. सबळ पुराव्यांमुळे आरोपी बर्डे याला दोषी ठरविण्यात आले. त्याला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा झाली. या खटल्याचा निकाल लागला. मात्र, त्या पीडितेवर झालेल्या अन्याय दूर झाला, असे म्हणता येणार नाही. शरीरातील जखमा मरेपर्यंत तिची साथ सोडणार नाहीत. त्या वेदना घेऊनच तिला जगावे लागणार आहे. आई-वडील सोबत नाही. शिशुगृहात राहावे लागत आहे. ही दुर्दैवी वेळ त्या चिमुरडीच्या नशिबी आली. यात तिचा काय दोष होता? खटल्याचा निकाल लागला, परंतु तिच्यावर झालेला अन्याय दूर झाला, असे म्हणता येणार नाही.

ती पीडिता सध्या शिशुगृहात

खटल्याचा निकाल लागला, आता आरोपीला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणीही होऊ शकते. सध्या ती चिमुरडी शिशुगृहात आहे. पण तिच्यासमोर प्रश्‍न अजून सुटलेले नाहीत. शरीरातील जखमांचे काय? भविष्यात कोठे राहायचे? कोण लग्न करणार? पालकत्व कोण स्विकारणार? अशा अनेक प्रश्‍नांचा गुंता तिच्याभोवती फिरत आहे.