होमपेज › Ahamadnagar › निवृत्तीनाथ पालखीचे श्रीरामपुरात स्वागत

निवृत्तीनाथ पालखीचे श्रीरामपुरात स्वागत

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:44PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

ग्यानबा तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, निवृत्ती महाराज की जयच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरच्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीचे श्रीरामपूर नगरीमध्ये भव्य स्वागत झाले.

संगमनेर रस्ता नाक्यावर पालखी व दिंडी संयोजकांचे स्वागत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्वागत केले. पालखीस हार घालत संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचे दर्शन घेतले. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो.नि.संपत शिंदे, उप पो.नि.शिंदे, वाहतूक विभागाचे पो.नि.पांडुळे व पोलिस कर्मचार्‍यांनी शहर पोलिस ठाण्यासमोर स्वागत केले. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी मेनरोडवर पालखीचे दर्शन घेतले.

स्वागताच्यावेळी नगरसेवक राजेश अलघ, बाळासाहेब गांगड, संतोष कांबळे, रवी पाटील, प्रकाश ढोकणे, जितेंद्र छाजेड, कलीमभाई कुरेशी, अल्तमेश पटेल, राजेंद्र पवार, ‘मुळा-प्रवरा’चे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, सेनेचे सचिन बडदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव लोढा व संचालक, हमाल मापाडी संघाचे सदस्य, आडत व्यापारी आदींनी पालखीचे स्वागत केले.

पालखी युवकांनी, कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत विठूनामाचे जयजयकारात मिरवणुकीने राममंदिर येथे आणली. तेथे उपाध्ये परिवार व राममंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर झिरंगे यांनी पालखीची पूजा केली. पालखीचे संयोजक मानकरी बाळकृष्ण महाराज, मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट त्र्यंबकेश्वर अध्यक्ष संजय नाना धोंडगे, पुजारी भानुदास गोसावी यांचा सन्मान कचरदास ललवाणी, रमेश कोठारी, संजय गाडेकर, संजय कोठारी, हरिभाऊ आजगे यांनी केला. दिंडीतील भाविकांना बाजार समिती, व्यापारी व शेतकरी यांच्यावतीने भंडारा देण्यात आला.

पालखीच्या स्वागताच्यावेळी चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. वारकरीच्या सेवेसाठी शेकडो स्टॉल लागले होते. पाणी, केळी, मिठाई, बिस्किट पुडे, भेळपुडे, शिरापुरी व पोहे यांचे वाटप अनेक मंडळांनी केले. वारकर्‍यांचे औषध उपचार व तपासणीची व्यवस्थाही मंडळांनी केली होती. शहर व वाहतूक पोलिसांनी पालखी मिरवणुकीच्यावेळी चोख बंदोबस्त राखल्याबद्दल मोहन महाराज बेलापूरकर यांनी धन्यवाद दिले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी नाक्यावर भक्तांना पाण्याच्या बाटल्या देण्याचे नियोजन केले. तसेच शहरात कचरा साठू नये, म्हणून रस्त्यात डस्टबिनची व्यवस्था करून कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमले होते.