Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Ahamadnagar › १ डिसेंबरपासून नगरचा पाणीपुरवठा बंद!

१ डिसेंबरपासून नगरचा पाणीपुरवठा बंद!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

पाणी योजनेसाठी मुळा धरणातून उचलल्या जाणार्‍या पाण्याच्या बिलाची थकबाकी 1.22 कोटीवर पोहचली आहे. नोटीसा बजावूनही महापालिका दाद देत नसल्यामुळे येत्या 1 डिसेंबरपासून शहर पाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मुळा पाटबंधारे विभागाने घेतला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली. दरम्यान, मनपाने गुरुवारी (दि.23) महावितरणला 57 लाखांचा धनादेश अदा केला आहे. त्यानंतर आता पाटबंधारे विभागानेही कठोर निर्णय घेतल्यामुळे मनपाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळानगर येथील पाणी योजनेसाठी महापालिका दररोज 73 दशलक्ष लीटर पाणी धरणातून उचलते. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला दरमहा 6 ते 7 लाख रुपये बील आकारते. या बिलांपोटी महापालिकेने 1 कोटी 22 लाख 60 हजार 637 रूपये थकविले आहेत. मुळा पाटबंधारे विभागाने आजतागायत मनपाला तीन वेळा नोटीसा बजावल्या आहेत. 20 ऑक्टोबर रोजी अंतिम नोटीस बजावल्यानंतर कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशाराही मनपाला देण्यात आला होता.

त्यानंतरही मनपाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे 1 डिसेंबरपासून मनपाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असूनही पाटबंधारे विभागाने सहकार्याचीच भूमिका ठेवली. मात्र, थकबाकी भरण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागत असल्याचे कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘महावितरण’ने पाणी योजनेच्या वीज बिलाच्या थकबाकीपोटी गुरुवारी वीज तोडली होती. त्यानंतर मनपाने 57 लाखांचा धनादेश अदा केला असून तो वटविण्यासाठी अधिकार्‍यांची धावपळ सुरू आहे. अशातच आता पाटबंधारे विभागानेही कारवाईचा निर्णय घेतल्यामुळे मनपासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. यातून तोडगा न निघाल्यास शहराला पुन्हा एकदा या कृत्रिम जलसंकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

अतिरिक्‍त जिल्हाधिकार्‍यांनी घातले लक्ष!

मनपाचे प्रभारी आयुक्‍त तथा अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी शासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकीबाबत लक्ष घातले आहे. त्यांनी स्वतः काही शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांशी चर्चा करून थकबाकी भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडेही मालमत्ता कराची थकबाकी असून त्यांचा बड्या थकबाकीदारांच्या यादीत समावेश आहे.