Mon, Aug 26, 2019 00:31होमपेज › Ahamadnagar › भंडारदरा 50, मुळा 28 टक्के भरले

भंडारदरा 50, मुळा 28 टक्के भरले

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 10:49PMराहुरी ः प्रतिनिधी

भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने दोन्ही धरणाकडे नवीन पाण्याची आवक वाढली आहे. काल सायंकाळी भंडारदरा 5732 तर मुळा धरणात 7500 दलघफू पाणीसाठा झाला होता. दरम्यान, मुळा धरणाकडे 7 हजार 310 क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक सुरू होती.

भंडारदरा पाणलोटात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात गेल्या 24 तासांत 472 दलघफू पाणी जमा झाले असून साठा 5732 दलघफू इतका झाला आहे. पाणलोटात दररोज सरासरी 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस सुरू आहे. आतापर्यंत भंडारदरा पाणलोटात 1042 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक घाटघरला 1624 मिमी इतका आतापर्यंत पाऊस पडला आहे. याशिवाय जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस रतनवाडीला 1636  मिमी इतका कोसळला आहे. 

वाकी धरण ओव्हरफ्लो झाल्याने गेल्या 9 दिवसांपासून कृष्णवंती वाहती आहे. काल वाकीचा 1022 क्यूसेकचा ओव्हर फ्लो कृष्णवंतीमधून निळवंडेच्या दिशेने झेपावला होता. त्यामुळे निळवंडेचा पाणीसाठा 1058 दलघफू इतका झाला होता. दरम्यान, भंडारदरा धरणातून हायड्रो  पॉवरसाठी 800 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. 

मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर पावसाची कृपा कायम आहे. लाभक्षेत्रावर वरूणराजा रुसला असताना घाटघर, हरिश्‍चंद्र गड, पांजरे, कोतूळ भागात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. धरणात 4 हजार क्यूसेक प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होत असताना पावसाचा जोर वाढल्याने धरणाकडे सद्यस्थितीला 7310 क्यूसेकने नवीन पाण्याची आवक झाली आहे. परिणामी धरणाचा साठा संथगतीने पुढे सरकताना दिसत आहे.

गत दोन दिवसात धरणामध्ये 1 टीएमसी पाणी जमा झाले असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्‍त होत आहे. लाभक्षेत्रावर मात्रवरूणराजाने दडी मारलेली आहे. आषाढी सरी पाणलोट क्षेत्रावर कृपादृष्टी दाखवित असताना लाभक्षेत्र मात्र कोरडेच आहे. गेल्या दोन दिवसांपासून राहुरी भागात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पावसाची कृपा नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला असून पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे लांबून का होईना शेतकर्‍यांना समाधान लाभत आहेत.