Sun, Jul 05, 2020 22:11होमपेज › Ahamadnagar › ‘फेज टू’ लाईनवरुन मीटरद्वारे पाणी!

‘फेज टू’ लाईनवरुन मीटरद्वारे पाणी!

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 11:05PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

‘युआयडीएसएसएमटी’ अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेतून (फेज टू) उभारण्यात आलेल्या शांतीनगर, निर्मलनगर, भिस्तबाग व बोल्हेगाव येथील टाक्या कार्यान्वित करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. योजनेतील अटी व शासनाच्या निर्देशानुसार नवीन लाईनवरून जोडणी देतांना मीटर बसविण्यात येणार आहे. ‘फेज 1’ प्रमाणेच खासगी ठेकेदार संस्थेमार्फत हे काम केले जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

‘फेज टू’ अंतर्गत शांतीनगर, निर्मलनगर, भिस्तबाग व बोल्हेगाव-नागापूर येथील पाण्याच्या टाक्यांची सर्व कामे पूर्णत्वाकडे आहेत. या टाक्यांवरून वितरण व्यवस्थेसाठीच्या डीआय व एचडीपीई लाईनही टाकण्यात आलेल्या आहेत. या टाक्या कार्यान्वित करून नवीन जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने नळ कनेक्शन देण्यात येणार असून त्याला मीटर (जलमापक) बसविण्यात येणार आहे. ‘युआयडीएसएसएमटी’सह अमृत अभियानांतर्गतही शासनाने मीटर बसविण्याची सक्ती महापालिकांना केलेली असून महासभेतही याबाबत ठराव करण्यात आलेला आहे. त्यानुसार या चारही ईएसआर झोनमधील कामाबाबत मनपाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, सुमारे 24 हजार नळ जोडण्या देणे व मनपाने पुरविलेले मीटर बसविण्याचे काम खासगी ठेकेदार संस्थेमार्फत होणार आहे. त्यासाठी निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, जुने नळ कनेक्शन असणार्‍यांना ‘फेज टू’च्या लाईनवरुन नळजोडणी देतांना पुन्हा शुल्क आकारणी होणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.