Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › ‘पाणीपट्टी’त वाढ अजेंड्यावर!

‘पाणीपट्टी’त वाढ अजेंड्यावर!

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 02 2018 11:52PMनगर ः प्रतिनिधी

पाणी योजनेवर होणारा खर्च व उत्पन्न यातील तफावत मोठी असल्याने व पाणीपट्टीपोटी मनपाची मागणीच मुळात कमी असल्याने दरवर्षी किमान 10 कोटींचा फटका मनपाला सोसावा लागत आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने अजेंड्यावर घेतला आहे. येत्या मंगळवारी (दि.6) होणार्‍या सभेत याबाबत निर्णय होणार असून पाणीपट्टीत 500 ते 1 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

2016-2017 च्या अर्थसंकल्पातच प्रशासनाने पाणीपट्टी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. यात व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या दरात वाढ करण्यास महासभेने मंजुरी दिली. मात्र, घरगुती वापराच्या दरात वाढ करण्यास महासभेने नकार दिला होता. त्यानंतर स्थायी समितीच्या 2017 -2018 च्या अंदाजपत्रकीय सभेत महासभेने निर्णय घेण्याचा ठराव करण्यात आला. मात्र, 20 फेब्रुवारीपूर्वी प्रस्ताव सादर न झाल्यामुळे महासभेने तो नाकारला. यंदा पुन्हा पाणीपुरवठा विभागाने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रलंबित प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला आहे. 

तसेच 2018-2019 या आर्थिक वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात प्रत्येक करयोग्य मूल्याच्या 2 टक्के अग्निशमन कर लागू करण्याचा प्रस्तावही स्थायी समितीच्या अजेंड्यावर आहे. मंगळवारी होणार्‍या सभेत पाणीपट्टीची वाढ व कर लागू करण्याच्या प्रस्तावावर निर्णय होणार आहे. ‘पाणीपट्टी’तून मिळणारे उत्पन्न व खर्च यात मोठी तफावत आहे. सध्याच्या उत्पन्नातून वीजबिले भरणेही महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे पाणीपट्टीत काही प्रमाणात का होईना वाढ करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाण्याची चिन्हे आहेत. मिळोल्या माहितीनुसार 1500 रुपयांच्या पाणीपट्टीत सुमारे 500 ते 1000 रुपयांपर्यंत वाढ करण्यास पदाधिकारी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. दरवाढीबाबत ‘स्थायी’च्या शिफारसीनंतर हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी 20 फेब्रुवारीपूर्वीच महासभेकडे सादर होणे अपेक्षित आहे.