Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Ahamadnagar › दूध आंदोलनावर सरकारी यंत्रणांचा ‘वॉच’

दूध आंदोलनावर सरकारी यंत्रणांचा ‘वॉच’

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:43PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शेतकरी संपानंतर आता दूध दरप्रश्‍नी विविध संघटनांसह दुग्ध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. आजपासून जिल्ह्यातून बाहेर जाणारा तब्बल 20 लाख लिटर दुधाचा पुरवठा बंद होणार असल्याने सरकारी यंत्रणा या आंदोलनावर ‘वॉच’ ठेवून आहेत. यातून पोलिस प्रशासनाने श्रीरामपूर विभागातील 50 पेक्षा अधिक आंदोलक शेतकर्‍यांना नोटिसा बजावल्या आहे. प्रत्येक रस्त्यावर पोलिस पथक तैनात करून दूध टँकरला संरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अनेक छोटे-मोठे दूध संकलन केंद्र व दूध संघांनी संकलन बंद ठेवण्याच्या मानसिकतेत असल्याने सरकारने तात्काळ दूधदरप्रश्‍नी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायाला अवकळा आली आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याच्या  मागणीसाठी, तसेच दूध दरवाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर दूध बंद आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले आहे. आजपासून सहा दिवस चालणार्‍या आंदोलनाच्या काळात सहकारी अथवा खासगी दूध संघांमधून मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणारे दूध रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नगर जिल्ह्यात दररोज 15 मल्टिस्टेट संघामधून 53 हजार लिटर, 14 सहकारी संघातून 5 लाख 11 हजार 620 तर 152 खासगी संघाच्या माध्यमातून 13 लाख 43 हजार 764 लिटर दुधाचे संकलन होते. अशा प्रकारे दररोज 20 लाख लिटर जिल्ह्यातून मुंबई, नागपूर, पुणे व अन्य ठिकाणी पाठविले जाते. मात्र, आजपासून हे आंदोलन सुरू होणार असल्याने हा दूधपुरवठाही बंद केला जाणार आहे. यासाठी विविध शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. तसेच अन्य संघटनाही त्यांना पाठींबा देत आहे. विशेष म्हणजे उत्तर जिल्ह्यात शिवसेनेनेही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे दूध आंदोलनातून सरकारची कोंडी होणार हे निश्‍चितच आहे. 

दरम्यान, या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता शेतकरी संपावेळी झालेली परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच राहुरीतील 28 तर श्रीरामपुरातील 25 आंदोलक शेतकर्‍यांना सीआरपीसी 149 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास, तसेच या कालावधीत सरकारी व खासगी मालमत्तांचे नुकसान केल्यास संबधितांना जबाबदार धरण्याचा नोटिसांद्वारे धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिस प्रशासनाने दूध संघ मालकांशी चर्चा करून कुणाला पोलिस बंदोबस्त हवा, असेल तर तो देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, काल सायंकाळपर्यंत कुणीही तशी मागणी केली नाही. त्यामुळे या आंदोलनात खासगी व सहकारी दूध संघही शेतकर्‍यांसोबत असल्याचे दिसते.

या आंदोलन काळात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी श्रीरामपूर उपविभागाचे पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे डोळ्यात तेल घालून आहेत. त्यांनी श्रीरामपूर आणि राहुरीसाठी 6 पथके तैनात आहेत. तेथे 1  पोलिस अधिकारी आणि त्यासोबत 5 पोलिस कर्मचारी बंदोबस्त बजावणार आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी दोन कर्मचारी पेट्रोलिंग करणार आहेत. पोलिस प्रशासनाकडून काही आंदोलकांवर विशेष नजर आहे. तसेच आंदोलन काळात कोणत्याही दूध संघाला टँकर पाठवायचा असेल, तर त्यांनी अगोदर पोलिस प्रशासनाशी संपर्क करून माहिती द्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.  दुसरीकडे संघटनांही आक्रमक झाल्याने मुंबईत दुधाची आरडाओरड होणार आहे.

कायदा हातात घेऊ नका  : वाकचौरे

दूध आंदोलनाबाबत पोलिस प्रशासन सतर्क आहे. श्रीरामपूर उपविभागात 6 अधिकारी व 30 कर्मचार्‍यांचे पथक ठिकठिकाणी तैनात केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी 50 पेक्षा अधिक आंदोलकांना तशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कालावधीत शांततेच्या मार्गाने  आंदोलन करावे, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन कुणीही करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.  - सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर