Mon, May 20, 2019 20:55होमपेज › Ahamadnagar › वाळू, मुरुम तस्करांविरुद्ध अटक वॉरंट

वाळू, मुरुम तस्करांविरुद्ध अटक वॉरंट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन, वाहतूक व साठा केल्याप्रकरणी 24 जणांविरोधात 1 कोटी 59  लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांनी हा दंड न भरल्याने प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्या आदेशानुसार 24 जणांविरुद्ध अटक वारंट जारी करण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू, माती, मुरूम  उपसा केला जातो. वाळू तस्कारांनी लाखो रुपयांची माती, वाळू उपसा केली होती.  या प्रकरणी 24 जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली.  त्यांनी दंड न भरल्याने  दंडात्मक रकमेचा बोजा त्यांच्या सात-बारा उतार्‍यावर चढविण्यात आला. मात्र तरीही  त्यास तस्करांनी दाद दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम अन्वये 178, 179, 180, 1841, 182, नुसार  त्यांच्या विरोधात अटक वारंट बजावण्यात आले आहे.

प्रशांत नलगे, आदिनाथ मदने, अजय मदने, विठ्ठलराव मोरे, लक्ष्मण जगताप, देविदास काकडे, पंढरीनाथ पासलकर, भानुदास मोरे (रा. सर्व जण सांगवी दुमाला), मच्छिंद्र सुपेकर (श्रीगोंदा), संभाजी वागस्कर, पोपट रुपनर (सुरोडी), दादा गोलांडे (आर्वी), संजय गिरमकर, मच्छिंद्र जगताप, रंगनाथ गिरमकर, किरण पवार (सर्व रा. अजनूज), प्रकाश कन्हेरकर, चंद्रकांत कन्हेरकर, सुरेश बोरुडे, संभाजी खेंडके, नंदू काळे (सर्व रा. मांडवगण), प्रकाश जगताप, विनोद जगताप, नितीन पठारे (रा. बनपिंप्री) यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. सर्वांत कमी प्रकाश नलगे यांना 3 हजार 100, तर सर्वांत जास्त दंड पंढरीनाथ पासलकर यांना 62 लाख इतका केला आहे.

कारवाई नक्की होणारच : महाजन

याबाबत तहसीलदार महेंद्र महाजन म्हणाले, महसूल विभागाने केलेली दंडात्मक रक्कम संबंधितांनी न भरल्याने त्यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्या आदेशानुसार अटक वारंट जारी करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तस्करांचे धाबे दणाणले

दरम्यान तहसीलदार महेंद्र माळी यांनी वाळू तस्करांविरोधात कडक धोरण घेतले असून, वाळू तस्करी रोखण्यासाठी कंबर कसली आहे. आता दंडात्मक रक्कम न भरणार्‍याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने गौण खनिज तस्करी करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Shrigonda,  sand murum smuggler, Warrant


  •