होमपेज › Ahamadnagar › निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून प्रभागरचना!

निवडणूक आयोगाचे निर्देश डावलून प्रभागरचना!

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 10:46PMनगर : प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता, परिसराच्या सीमा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या-नाले, डोंगर, डीपी रस्त्याच्या सिमा विचारात घेणे आवश्यक होते. मात्र, मनपा प्रशासनाने तयार केलेल्या प्रभागरचनेत नैसर्गिक हद्दींसह राष्ट्रीय महामार्ग ओलांडून चुकीच्या पद्धतीने प्रभागरचना करण्यात आल्याची हरकत सामाजिक कार्यकर्ते महावीर पोखर्णा यांनी नोंदविली आहे. दरम्यान, प्रभाग रचना प्रसिद्ध करताना व्याप्तीमधील माहिती स्पष्ट नसल्याची हरकत नगरसेवक संजय घुले यांनी नोंदविली आहे.

प्रभागरचना फक्त निवडणुकीपुरतीच नसते. तर नंतरच्या काळात नागरी सुविधा देण्यासाठी प्रभाग डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय होतात. शहरात महापालिकेचे प्रशासकीय कामकाज चार प्रभाग समिती कार्यालयांमार्फत चालते. अनेक ठिकाणी दोन व तीन प्रभाग समितीच्या हद्दीमधील भाग एकाच प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. कोणती गल्ली कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे, याचाही स्पष्ट उल्लेख नाही. प्रभागरचना ही नागरिकांच्या हिताची न करता, काही राजकीय पक्षांना सोयीचे राजकारण व्हावे, या दृष्टीने केल्याचे दिसते. निवडणुका झाल्यानंतर नागरिकांना नागरी समस्येबाबत नगरसेवकांकडे मागणी करताना अडचणी येणार आहेत. सध्याच्या रचनेचा उमेदवारांना नाही, तर नागरिकांना फटका बसणार आहे.

भौगोलिक रचना, रेल्वेमार्ग, महामार्ग, नाले अशा प्रकारचे अडथळे रचना तयार करताना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र, या संदर्भात आयोगाने दिलेले निर्देश न पाळण्यात आल्याने प्रभाग रचनेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. प्रभाग 4 मध्ये सावेडी उपनगरातील अनेक भागांचा समावेश आहे. या प्रभागात पुणे-औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून फकिरवाडा परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे. असाच प्रकार अनेक प्रभागांत झालेला आहे. महामार्ग तोडून केलेल्या आश्‍चर्यकारक रचनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत मोठी शंका निर्माण होत आहे. याबरोबरच प्रभाग क्रमांक 15 व 16 मध्ये रेल्वेमार्ग ओलांडून अनेक भागांचा समावेश केलेला दिसून येत आहे. या सर्वांचा फटका भविष्यात नगरसेवकांना नव्हे, तर नागरिकांनाच बसणार असल्याने या हरकतीचा विचार करावा, असे पोखर्णा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाने प्रभाग रचनेची व्याप्ती देताना थोडक्यात दिलेली असल्याने तसेच चतुःसिमा स्पष्टपणे लक्षात येत नसल्याने नगरसेवकही संभ्रमात सापडले आहेत. या संदर्भात नगरसेवक घुले यांनी हरकत नोंदवून लक्ष वेधले आहे. प्रभाग रचनेचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून  6 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींचा प्रशासन गांभीर्याने विचार करणार का? याकडे लक्ष लागले आहे.