Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Ahamadnagar › वेळेवर उपचारांअभावी रुग्ण महिलेचा झाला मृत्यू

वेळेवर उपचारांअभावी रुग्ण महिलेचा झाला मृत्यू

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:19PMचिचोंडी पाटीलः  वार्ताहर

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने महिला रुग्ण दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात असून, संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शनिवारी रात्री चिचोंडी पाटीलपासून जवळच असलेल्या गहूखेल गावातील महिला मुनाबी नसीर शेख (वय 36) या अचानकपणे बेशुद्ध पडल्याने पती नसीर शेख व नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथे रात्री 2 वाजता उपचारासाठी आणले. रात्री नेमणुकीवर असलेले डॉ. संजय निकम दवाखाण्यात उपस्थित नव्हते. त्यामुळे सदर महिलेस रुग्णालयातील उपचार मिळाले नाहीत. डॉ.निकम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी मी घरी असल्याचे सांगितले.  

रुग्णालयात कोणीच डॉक्टर थांबत नाहीत, त्यामुळे मी ही थांबत नाही. तुम्ही बाकीच्या डॉक्टरांना सुद्धा थांबायचे सांगा, मलाच का सांगता? असे उद्धटपणाचे उत्तर दिले.त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण महिलेचा जीव गेला.वेळीच उपचार मिळाला असता तर महिलेचा जीव वाचलाच असता, अशी प्रतिक्रिया मयत महिलेच्या पतीने दिली.

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे व निष्काळजीपणामुळे रुग्ण महिला दगावल्याची आणि सदर घटनेस ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटीलचे वैद्यकीय अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप मयत महिलेचे पती शेख व नातेवाईकांनी दिली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी नेमणूक असून सुद्धा हजर नसतात.त्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा चिचोंडी पाटील येथील घटनेने आला.वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत.