Fri, Apr 26, 2019 04:13होमपेज › Ahamadnagar › वंजारी आरक्षणासाठी फुंकले रणशिंग!

वंजारी आरक्षणासाठी फुंकले रणशिंग!

Published On: Sep 01 2018 1:44AM | Last Updated: Aug 31 2018 10:56PMखरवंडी कासार ः वार्ताहर

वंजारी आरक्षणाबाबत बैठक घेण्यास महंतांनी केलेल्या विरोधानंतरही, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड हे शुक्रवारी (दि.31)  समर्थकांसह भगवानगडावर आले. संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन, वंजारी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रणशिंग फुंकल्याचे त्यांनी जाहीर केले. भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यात यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

संत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त भगवानगडावर भक्‍तांची गर्दी होणार असल्याने, आरक्षणासाठी आयोजित बैठकीमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे पत्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रशासनाला दिले होते. त्यांच्या या पत्रामुळेे पुन्हा एकदा महंत व मुंडे समर्थकांमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली होती.  या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून शुक्रवारी (दि.31) भगवानगडावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दर्शन घेऊन भाविक तातडीने निघून जात होते. फुलचंद कराड यांनी आपल्या शंभर ते दीडशे समर्थकांसह भगवानगडावर येऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत अमित मुंडे, शैलेश मुंडे, गोविंद मुंडे, माऊली फड, सुग्रीव नागरगोजे, पप्पू खेडकर, कल्पेश गर्जे, बाळासाहबे नागरे, परमेश्वर मुंडे उपस्थित होते. त्यानंतर मुख्य मंदिरातच थोडक्यात बैठक घेऊन आता आरक्षणाचा लढा सुरू झाल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले, आम्हाला एनटी प्रवर्गातून काढून ओबीसी वर्गात टाका. तेथे 21% आरक्षण तरी मिळेल.

सरकार आमचंच असल्यानेे ते आरक्षण देईल. वंजारी समाजाची लोकसंख्या सुमारे दीडकोटी झाली आहे. केंद्रात आम्ही ओबीसी प्रवर्गात आहोत. राज्यात एनटी (ड) वर्गात असून, केवळ 2 टक्के आरक्षण आहे. 12 टक्के लोकसंख्या असताना 2 टक्के आरक्षण आम्हाला अडचणीचे ठरत आहे. सर्वसाधारण जागेतून समांतर आरक्षणाच्या मुद्यावर आम्हाला जागा दिली जात नाही. वंजारी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाज रस्त्यावर उतरल्यावर नामदेवशास्त्रींना देखील आमच्यात सहभागी व्हावे लागेल. संत भगवान बाबांच्या समाधीच्या दर्शनाने आम्हाला उर्जा मिळाली असून, आता लढा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यानंतर पत्रकारांनी महंत नामदेवशास्त्री सानप यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, भगवान गडाची शांतता कोणीही भंग करण्याचा प्रयत्न करू नये. भाविक, देवस्थान व प्रशासनाला वेठीस धरू नये. संत भगवान बाबांची शिकवण शांततेची आहे. आम्ही त्यांचे विचार समाजात रूजविण्याचे काम करत आहोत. मी राजकारणी नसल्याने कोणाला आरक्षण मिळावे, म्हणून कशाला कुठे जाईल? भगवानगड सामाजिक प्रश्नासाठी नसून, तो अध्यात्मिक शांतीसाठी आहे. मी शुद्ध वारकरी आहे. त्यांच्यात सहभागी व्हायला मी काही राजकारणी नाही. 

दरम्यान, प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी गुरूवारी (दि.30) रात्री दहा पासून ते शुक्रवारी (दि.31) रात्री 8 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केला होता. तहसीलदार नामदेव पाटील व ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे दिवसभर भगवान गडावर थांबून होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.