Mon, Jun 24, 2019 16:47होमपेज › Ahamadnagar › वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 10:58PMवाळकी : वार्ताहर

वाळकी (ता. नगर) येथे वालुंबा नदीला आलेल्या पुराने नदीकाठचा रस्ता वाहून गेला. मात्र तीन महिने होऊनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशानाचे दुर्लक्ष झाल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच रस्त्याच्या कडेलाच येथील आठवडे बाजार भरतो. ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर होतो. 

वाळकी हे गाव पंचक्रोशीतील मोठ्या लोकसंख्येचे गाव.गावात नदीकाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. रुग्णालयाकडे जाण्यासाठी नदीपात्राच्याकडेने भराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र वालुंबा नदीला आलेल्या पुराने हा रस्ता वाहून गेला. तसेच ग्रामीण रुग्णालयातही पाणी शिरले होते. रुग्णालयाची संरक्षक भिंत पाडून पाणी बाहेर काढले होते. मात्र त्या भिंतीचीही अजून दुरुस्ती झाली नाही. रस्ता वाहून गेल्याच्या घटनेला जवळ जवळ चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

मात्र रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. येथील रुग्णालयात उपचारासाठी देऊळगाव, राळेगण, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, वाळुंज, पारगाव, हिवरेझरे, बाबुर्डी घुमट, बाबुर्डी बेंद, खडकी आदी गावांतील रुग्ण येतात. त्यामुळे या रस्त्यावर कायमच मोठी वर्दळ असते . मात्र हाच रस्ता वाहून गेल्याने वाहतूक  धोकादायक बनली आहे. रात्रीच्या वाहतुकीस हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जि. प. सदस्य व पं. स. सदस्यांनी, तसेच ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी लक्ष घालून तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.