Thu, Aug 22, 2019 09:03होमपेज › Ahamadnagar › जायकवाडीला नवीन पाण्याची प्रतीक्षा!

जायकवाडीला नवीन पाण्याची प्रतीक्षा!

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:15PMशेवगाव : रमेश चौधरी

पावसाअभावी जायकवाडी जलाशयात महिन्यापासून नवीन पाण्याची आवक झाली नाही. गोदावरी नदीपात्रासह इतर नद्या दुथडी भरून वाहण्याच्या प्रतिक्षेत असून, धरणात फक्त 19 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

शेवगाव तालुक्याला वरदान असणारे जायकवाडी जलाशय प्रत्येक वर्षी पूर्ण क्षमतेने भरावे अशी प्रत्येकांची इच्छा असते परंतु ही इच्छा शेवटी निसर्गावरच अवलंबून आहे. निसर्गाच्या मनात आले तर आठच दिवसात जलाशयात पाणी पाणी होऊ शकते, नसता जलसंकटही येऊ शकते. सन 2004 ते 2008  ही  पाच वर्ष सलग नाथसागर भरणारी ठरली. 2008 मध्ये तर जायकवाडी, पैठण सह गोदावरी काठातील काही गावे पाण्याने अक्षरशः तुबंली गेली होती. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये जलाशय पूर्ण भरले गेले होते.

यंदा पावसाळा सुरू होऊन एक महिना सरला तरीही जोरदार पावसाअभावी नद्या, नाले, दुथडी भरून वाहिले नसल्याने नाथ सागरात पाण्याची आवक झाली नाही. उलट दररोज पिण्याचे पाणी, औद्योगिक पाणी, शेती मोटारी असा उपसा चालू असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. यंदाचा पावसाळा सुरू  होऊन एक महिना सरला आहे. मृग,आर्द्रा नक्षत्रात मोजका पाऊस झाला. या पावसाणे नदी, नाल्यांची तहान भागली नाही. आता पुर्नवसू नक्षत्र चालू आहे. यात सतत हवामान ढगाळ राहून अधूनमधून एखादा थेंब टिपकतो तर कधीमधी थुईथुई पाऊस पडत आहे. त्यात गारवारे वाहत असल्याने जोरदार पावसाची शक्यता अपेक्षित नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

महिन्यापासून निसर्ग आकडल्याने पूरग्रस्त स्थिती निर्माण होईल असा जोरदार पाऊस झालाच नाही. परिणामी जायकवाडी जलाशय नवीन पाण्याच्या प्रतिक्षेत राहिले आहे. नाशिक, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासा या भागात पाऊस होऊन नद्या वाहिल्यास जायकवाडीत पाण्याची आवक होते. त्यात नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे उभारले गेले आहेत. या बंधार्‍यांची दरवाजे बंद केल्यास बंधारे भरून पाण्याचा प्रवाह वाढल्याने धरणात पाणी पातळी वाढण्यास मदत होते. मुळा नदीवर मुळा धरण आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा, निळवंडे, अशी धरणे तर  दारणा, करजंवणे, गंगापूर यातील पाणी नांदूर मध्यमेश्वर धरणात येते. या धरणाची दरवाजे उघडल्यास जायकवाडीत पाण्याची झपाट्याने वाढ होते.काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे, मात्र ही धरणे भरल्याशिवाय नाथसागरात स्त्रोत्र वाढण्याची शक्यता कमी आहे.

जायकवाडी धरणाची 102 टीएमसी पाणी क्षमता आहे. सध्यस्थितीत धरणात 40 टीएमसी (19 टक्के) जलसाठा असून, साडेचौदा टीएमसी पाणी उपयुक्त आहे. धरण फुगवट्याखाली क्षेत्रात उभे असणारे ऊस पिक पाण्याच्या अडचणीत येऊ पाहत आहे. धरणाच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने फुगवट्याचे पाणी भिंतीकडे सरकत चालले आहे. यातील लाभार्थी शेतकर्‍यांना हे पाणी पिकासाठी देता यावे म्हणून रात्री बेरात्री झगडत मोठी कसरत करावी लागत आहे. तर पाणीसाठयात वाढ होण्याऐवजी ती घटत राहिल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार असल्याने निसर्गाची कृपा होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि जलसाठा वाढू दे अशीच प्रार्थना आता पांडूरंगा चरणी चालू आहे.