Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Ahamadnagar › जीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम!

जीपीओ रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम!

Published On: Dec 04 2017 1:39AM | Last Updated: Dec 03 2017 11:03PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ, चांदणी चौक, नगर कॉलेजपर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे व तेथील ड्रेनेजच्या समस्येबाबत आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध द्यायची तयारी जिल्हाधिकार्‍यांनी दाखविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनानंतर महासभेत याबाबत ठरावही करण्यात आला. मात्र, अडीच महिने लोटले तरी अद्याप निधी मागणीचा प्रस्तावच जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला नसल्याचे पुढे आले आहे.

जीपीओ चौक ते हातमपुरा, अशोका हॉटेल ते बीएसएनएल ऑफीस, डावरे गल्ली, चांदणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, सैनिक लॉन-नगर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय व बाबा बंगाली चौक परिसर, झेंडीगेट, इब्राहीम कॉलनी आदी भागातील गटार व ड्रेनेज या परिसरात असलेल्या अवैध कत्तलखान्यांमधील अ‍ॅनिमल वेस्टमुळे तुंबण्याचा प्रकार नित्याचाच झालेला आहे. मागील वर्षी या रस्त्याच्या दुरवस्थेचा व ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांचेही या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते.

मनपाची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने व काम तात्काळ मार्गी लागणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. डिसेंबर 2016 व जानेवारी 2017 या दोन महिन्यात जिल्हाधिकार्‍यांनी तीन वेळा पत्रे पाठविल्यानंतरही याबाबत कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. यावेळी आ. जगताप यांनी सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडले होते. या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. अखेर 15 सप्टेंबर रोजी प्रस्ताव महासभेसमोर येवून 1 कोटी 76 लाख 17 हजार 628 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. तसेच निधीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

महासभेचा ठराव होऊन अडीच महिने लोटले तरी अद्याप निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर झालेला नाही. या परिसरातील ड्रेनेजच्या समस्येवरुन वारंवार आंदोलने झालेली आहेत. काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज तुंबल्याच्या रागातून नगरसेविकेच्या पुत्राने मनपा कर्मचार्‍यांना मारहाण केल्याचीही घटना घडली आहे. बाबा बंगाली चौकातील रस्ता व ड्रेनेजचा प्रश्‍न गंभीर असतांना आणि या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविलेली असतांनाही व महासभेचा ठराव झालेला असतांनाही अद्याप प्रस्ताव सादर झालेला नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.