होमपेज › Ahamadnagar › शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा

शेतकर्‍यांना अनुदानाची प्रतीक्षा

Published On: Feb 22 2018 1:26AM | Last Updated: Feb 22 2018 12:07AMशेवगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील 57 हजार शेतकर्‍यांचे 47 हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने बाधित झाले आहे. मात्र नुकसानभरपाईबाबत शासनाचा अद्याप निर्णय झालेला नसल्याने हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

यंदा निसर्गाने खरीप व रब्बी पिकाची पुरती वाट लागली. वारेमाप खर्च करुनही निसर्गाने उत्पन्न हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांना बाजारात भाव राहीला नाही. बदलते हवामान आणि रोगांचा प्रादुर्भाव या प्रकाराने उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. खर्च व उत्पन्न यात मोठ्या प्रमाणात तफावत होऊन शेतकर्‍यांची पुन्हा कर्जबाजारीपणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. परिणामी हे वर्ष शेतकर्‍यांच्या नुकसानीचे ठरले आहे.

ज्या पिकावर शेतकर्‍यांचा वर्षाचा जमा-खर्चाचा आराखडा तयार होतो, त्या कपाशी पिकाची यावर्षी विचित्र हवामानाने वाट लावली. चांगले पीक म्हणता म्हणता उत्पन्न हाती येण्याच्या व बोंडअळी फिरण्याची वेळ एकच झाली. त्यामुळे पांढरे शुभ्र उत्पन्न काळे ठिक्कर पडले. त्याचा फुलावा जाऊन कवड्या हाती येऊ लागल्या. उत्पन्न तर घटलेच परंतु बाजारभावही पडले. शेवटी कपाशी पिकात नांगर घालावा लागला. काही शेतकर्‍यांना उत्पन्नाच्या अगोदरच कपाशी पीक मोडण्याची वेळ आली.

राज्यभर बोंडअळीने कपाशी पीक गेल्याने शासनाने मदतीची घोषणा केली. त्यानुसार फेरबदल होत पंचनामे झाले. यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला. तरीही अद्याप भरपाई बाबत ठोस निर्णय जाहीर होत नसल्याने शेतकर्‍यांत साशंकता निर्माण झाली आहे. शेवगाव तालुक्यात शेवगाव मंडलातील 10 हजार 833 शेतकर्‍यांचे 9 हजार 617 हेक्टर क्षेत्र, चापडगाव मंडलातील 11 हजार 52 शेतकर्‍यांचे 8 हजार 145 हेक्टर, एंरडगाव मंडलातील 5 हजार 700 शेतकर्‍यांचे 4 हजार 508 हेक्टर, बोधेगाव मंडलातील 16 हजार 108 शेतकर्‍यांचे 15 हजार 259 हेक्टर, ढोरजळगाव मंडलातील 6 हजार 973 शेतकर्‍यांचे 5 हजार 472 हेक्टर, भातकुडगाव मंडलातील 6 हजार 839 शेतकर्‍यांचे 4 हजार 190 हेक्टर क्षेत्र, असे 57 हजार 505 शेतकर्‍यांचे 47 हजार 192 हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधीत झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासन दरबारी सादर केला आहे.

33 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधीत झालेले आहे. यात 54 हजार 609 शेतकर्‍यांचे  दोन हेक्टर पेक्षा कमी असणारे 41 हजार 466 हेक्टर क्षेत्र आहे. 2 हजार 896 शेतकर्‍यांचे दोन हेक्टर पेक्षा जास्त असणारे क्षेत्र 5 हजार 726 हेक्टर आहे. 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांना 6 हजार 800 रुपये हेक्टरी मदत दिल्यास 28 कोटी 19 लाख 70 हजार 704 रुपये लागणार आहेत, तर सरसकट मदत दिल्यास 32 कोटी 9 लाख 9 हजार 952 रुपयांची तरतुद करावी लागणार असल्याचा अहवाल सादर झाला आहे. मात्र अहवाल सादर होऊनही अद्याप मदतीबाबत कुठलीच हालचाल नाही.