Tue, Apr 23, 2019 07:37होमपेज › Ahamadnagar › शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर

शिक्षक मतदारसंघ निवडणूक लांबणीवर

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMनगर : प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 8 जून 2018 रोजी जाहीर केली. त्यानुसार निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक यंत्रणा आणि शिक्षक नेत्यांची धावपळ सुरु झाली असतानाच, भारत निवडणूक आयोगाने शाळांच्या सुट्यांचा कालावधी सुरु असल्याने, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. निवडणूक कार्यक्रम, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी तारीख आयोगाकडून नंतर घोषित केली जाणार आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांची मुदत येत्या जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 12 एप्रिल रोजी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 8 जून 2018 रोजी मतदान होणार होते. त्यादृष्टिने जिल्हा निवडणूक विभागाने पत्रकार परिषद घेवून कार्यक्रम जाहीर केला. 8 जूनला मतदान होणार असे ग्रहीत धरुन, जिल्हा निवडणूक यंत्रणा कामाला देखील लागली. दरम्यान, सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडीत व बाबासाहेब गांगर्डे यांनी  जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली. जिल्हा प्रशासनाने सदर निवेदने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविली. नाशिक विभागातील इतर जिल्ह्यातूनही अशीच निवेदने काढली गेली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी जोमाने सुरु केली. आचारसंहिता कक्ष तयार केला गेला. शिक्षक संघटनांनी देखील मतदार यादी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडली. 

या निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली. या निवडणुकीसाठी आजपासून (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याने,  केलेल्या नियोजनाची माहिती देखील जिल्हा प्रशासनाने काल (दि.14) पत्रकार परिषदेत दिली. असे असतानाच काल (दि.14) सायंकाळी ही निवडणूक पुढे ढकलली गेल्याची वार्ता धडकली. सुट्यांचा कालावधी सुरु असल्याने सदर निवडणूक पुढील कालावधीत घेण्याची विनंती राज्याचे मुख्य  निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने सदर निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, सुधारित कार्यक्रमनंतर जाहीर केला जाईल, असे आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आल्याचे नाशिक विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्‍त रघुनाथ गावडे यांनी सांगितले.