Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांना धान्य, दूध व भाजीपाला भेट

मुख्यमंत्र्यांना धान्य, दूध व भाजीपाला भेट

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 06 2018 12:17AMपाथर्डी /मढी : वार्ताहर

शेतकर्‍यांना दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी खचून जाऊन आत्महत्या करत आहे. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले असून, सरकारला जाग येण्यासाठी पाथर्डी तहसील प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांना दूध, धान्य व भाजीपाला भेट देत शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन केले.

गेल्या वर्षी शेतकरी संप व ऐतिहासिक लाँग मार्चला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करा, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा, या मागण्यांसाठी काल (दि.5)  सकाळी पावसात भिजत शेतकरी सर्घष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड सुकाणू समिती सदस्य साईनाथ घोरपडे, बन्सी आठरे, विनायक चौधरी, दीपकराव माने, अमोल ठोंबरे, अदिनाथ माने, योगेश चितळे, यमाजी सावंत, कानिफ मरकड, शुभम वाबळे आदी उपस्थित होते. 

सरकारी धोरण व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले असून, सरकारने मागील वर्षी शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकारच्या या फसवणुकीमुळे शेतकरी आणखी खचले असून, कर्जमाफीच्या घोषणेनंतरही आत्महत्या करत आहेत. त्याची आठवण म्हणून शेतकरी संघर्ष समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाथर्डी तहसील मार्फत धान्य, दूध, भाजीपाल्याच्या परड्या भेट देत आपला भावना व्यक्त केल्या. शेतकर्‍यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी पुढे येत नाही.  स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्घष समिती हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी सांगीतले.