Fri, Apr 26, 2019 16:00होमपेज › Ahamadnagar › विखे पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा वाटतो

विखे पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा वाटतो

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:25PM श्रीरामपूर : प्रतिनिधी

राजकारणात राहून सद्विचाराने संत सेवेत बहुमूल्य योगदान देणारे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब  विखे पाटील यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला ज्ञानोबा-तुकोबांचा पुरस्कार वाटतो, असे उद‍्गार  निष्काम कर्मयोगी बाळकृष्ण महाराज भोंदे यांनी काढले. पुरस्काराची अकरा हजार रक्कम त्यांनी व्यासपीठावरच आळंदी येथील कृष्णदास लोहिया महाराज संस्थेला दान केली. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक (जि. नगर) येथील जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने तुकाराम बीज उत्सवानिमित्त आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण व तुलसी रामायण कथेची सांगता नरेंद्र महाराज गुरव यांच्या कल्याच्या कीर्तनाने झाली.त्यानंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभात भोंदे महाराज बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र विखे, माजी सरपंच काशिनाथ विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे आदी मान्यवर उपस्थित होते. भोंदे महाराज म्हणाले की, मी कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. ज्ञानोबा-तुकोबांनी समाजाच्या भल्यासाठी हाल-अपेष्टा सहन केल्या. त्यांना पोटभर अन्नही मिळत नव्हते. त्यांनी मान-सन्मान कधीच स्वीकारला नाही. उलट अपमानच त्यांच्या वाट्याला आला. आपण त्यांचे अनुयायी आहोत, म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे संत सेवक होते.त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मी ज्ञानोबा-तुकोबांचा पुरस्कार म्हणून स्वीकारत असल्याचे सांगितले.    प्रारंभी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची व साईबाबांच्या ग्रंथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.