होमपेज › Ahamadnagar › अपशब्द वापरल्याने औटींविरोधात संताप

अपशब्द वापरल्याने औटींविरोधात संताप

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 11:26PMपारनेर/सुपा/जवळा : वार्ताहर

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांविषयी आ. विजय औटी यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी तालुक्यात बुधवारी (दि. 29) ठिकठिकाणी पडसाद उमटले. विविध ठिकाणी औटी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येऊन वक्‍तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, आपल्या भाषणाची मोडतोड करून बनावट ध्वनीचित्रफीत तयार करण्यात आल्याचा खुलासा आ. औटी यांनी केला आहे. 

तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. औटी यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना माझा राजीनामा मागायला माझ्या गावातील पाच-पन्नास पोरे बसस्थानकावरून निघाले. ते आल्यावर मराठा समाजातील गरीब मुलांच्या आरक्षणास माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. राजीनामा मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुमच्यातील एकानेही मला मत दिलेले नाही, अशा आषयाची ध्वनीचित्रफीत गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यानंतर तालुक्यात आ. औटी यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उधाण आले असून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आ. औटी यांनी या वक्‍तव्याविषयी माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे.

बुधवारी पारनेर, सुपा, भाळवणी, टाकळीढोकेश्‍वर, जवळा येथे क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आंदोलने करून औटी यांच्या वक्‍तव्याचा निषेध नोंदविला. पारनेर, जवळा व भाळवणी येथे औटी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. सुपा येथे पुतळ्याचे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी तो ताब्यात घेतला, तर टाकळी ढोकेश्‍वर येथे औटींच्या प्रतिमेस काळे फासण्यात आले. वडनेर बुद्रूक येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे यांनी औटी यांच्या वक्‍तव्याच्या निषेधार्थ सरपंचांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला. शेटे यांचे आ. औटी यांच्याशी मोबाईलवर झालेले संभाषणही व्हायरल झाले असून या संभाषणातही औटी यांनी या विधानाचा इन्कार केला आहे. औटी हे ध्वनीचित्रफित बनावट असल्याचा दावा करीत असतील, तर त्यांनी तसा गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल आंदोलकांनी केला. 

दरम्यान, या वादासंदर्भात आ. औटी यांनी खुलासा केला असून, मी न बोललेली वाक्ये सॉफटवेअरमध्ये गडबड करून माझ्या तोंडी घालण्यात येऊन  सोशल मीडियावर व्हायलर करण्यात आली आहेत. नगरला मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी नियोजनासाठी आपण एक लाख रूपये दिलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्याच्या मागणीला माझा आजही पाठिंबा आहे, उद्याही राहील. माझ्या व्यक्‍तीगत बदनामीचा हा  प्रकार असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे आ. औटी यांनी खुलाशात नमूद केले आहे.