होमपेज › Ahamadnagar › पाश्चिमात्य संस्कृती थोपविण्याची मोठी जबाबदारीः वेंकय्या नायडू

पाश्चिमात्य संस्कृती थोपविण्याची मोठी जबाबदारीः वेंकय्या नायडू

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 1:42AM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

पाश्चिमात्य लोक भारतात येऊन आपली संस्कृती शिकले. पण, आपण त्यांची असभ्य संस्कृती अंगिकारत आहोत. या पाश्चिमात्य संस्कृतीला थोपविण्याची मोठी जबाबदारी भारतीयांवर आहे, असे सांगतानाच साईबाबांचा श्रद्धा व सबुरीचा मंत्र  स्वीकारून सर्वांनी मानवसेवेचे व्रत अंगिकारावे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले. 

शिर्डीतील साईनगर मैदानात आयोजित जागतिक साईमंदिर विश्वस्त परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, पोस्ट खात्याचे मुख्य प्रबंधक हरिश्चंद्र अग्रवाल, साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, नगराध्यक्षा योगिता शेळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी साई मंदिराबरोबर आपली छाया छापता येणार्‍या ‘माय स्टॅम्प’ योजनेचे विमोचन करण्यात आले. यासाठी देशविदेशातील मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

उपराष्ट्रपती नायडू पुढे म्हणाले,  साईबाबांनी माणसे जोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आपल्यामध्ये प्रेम आणि वात्सल्य आले पाहिजे. समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती दाखवत बसण्यापेक्षा त्यांना सहाय्य केले पाहिजे. त्यातूनही भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. असा सांस्कृतिक वसा साईबाबांनी दिला आहे. समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी ‘सबका मलिक एक’ हा संदेश साईबाबांनी दिला आहे. 

ना. राम शिंदे म्हणाले, शिर्डीच्या साई मंदिरात होत असलेल्या पूजाअचार्र् या इतर ठिकाणच्या मंदिरातही शिर्डीबरोबरच करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व साईमंदिरे जोडली जाणार आहेत. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, साईबाबा संस्थानने आयोजित केलेला साई मंदिर विश्वस्त परिषदेचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस आहे. बाबांपासून कोणताही भक्त दूर जाऊ शकत नाही. या भूमीत बाबांनी जगाला एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे ही परिषद म्हणजे शताब्दी सोहळ्याला एक प्रतिसादच आहे. 

संस्थानचे अध्यक्ष डॉ.हावरे म्हणाले, देशात 800  हून तर विदेशात 500 पेक्षा अधिक साईमंदिरे आहेत. जगातील साई मंदिरांना एका साचबंधाची गरज होती. या निमित्ताने शिर्डीतील मंदिराशी इतर मंदिरे इंटरनेटशी जोडून या मंदिराचे एकावेळी सर्व मंदिरात धार्मिक विधी करता येऊ शकणार आहेत. येत्या 30 डिसेंबरला महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.