Fri, Jul 19, 2019 17:54होमपेज › Ahamadnagar › वारीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी : सुजित झावरे

वारीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी : सुजित झावरे

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 12:10AMपारनेर/ टाकळी ढोकेश्‍वर : प्रतिनिधी

पंढरीच्या वारीची नोंद गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले. 

आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळशी येथील विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा झावरे यांच्या हस्ते करण्यात आली. महापूजेनंतर झावरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तालुक्यात मुबलक पाऊस पडून बळीराजाला सुखाचे दिवस येऊ  दे, असे साकडे आपण विठुरायास घातल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, प्रत्येक भक्‍त मंदिरात जाऊन देवाकडे काही ना काही मागणे मागतो. परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला वारीला जाणार्‍या वारकर्‍यांची  भावना निरपेक्ष असते. त्यांना पांडुरंगास काही मागायचे नसते. पांडुरंगाच्या भेटीने त्यांना वर्षभराची ऊर्जा मिळते. राज्यभरातून लाखो वारकरी दिंडीने पंढरीकडे प्रस्थान ठेवतात, हे आश्‍चर्यच असून, त्याची गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करणार आहोत. आपल्या या प्रयत्नांना नक्‍कीच यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

पुरातन असलेल्या पळशी येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचा शासनाच्या क वर्ग देवस्थान योजनेमध्ये आपण समावेश केला असून, त्या माध्यमातून भक्‍तनिवास तसेच परिसर सुशोभिकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मंदिर तसेच परिसरातील विकास कामांसाठी आणखी 25 ते 30 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही झावरे यांनी यावेळी दिली. यावेळी प्रभाकर अण्णा पोळ, बा. ठ. झावरे, मिठू जाधव, संतोष जाधव, किसन वाळुंज, रामचंद्र जाधव, अप्पासाहेब शिंदे, उमाहरी मोढवे, संतोष सुडके, संतोष बोरुडे, स्वप्नील राहिंज, अमोल उगले, प्रसाद झावरे, दत्ता जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.