Thu, Jul 18, 2019 16:37होमपेज › Ahamadnagar › वांबोरी चारीचे पाणी पोहचले 64 तलावांत

वांबोरी चारीचे पाणी पोहचले 64 तलावांत

Published On: Mar 24 2018 1:45AM | Last Updated: Mar 23 2018 10:36PMकरंजी : वार्ताहर

 राहुरी-नगर-पाथर्डी तालुक्यातील पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी पाईपलाईनचे पाणी लाभधारक 63 तलावांमध्ये पूर्ण दाबाने अखेर पोहचले. या पाण्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांच्या उपेक्षा उंचावल्या असून, लाभधारक शेतकर्‍यांनी देखील पाणीपट्टी भरण्यासाठी लगबग सुरू केली आहे. वांबोरी पाईपलाईनसाठी लागणार्‍या विजेची थकबाकी एक कोटी दहा लाख रुपये थकली होती. त्यामुळे यावर्षी ही योजना सुरू होण्याची शक्यता मावळली होती.परंतु आ. शिवाजीराव कर्डिले यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून  ही योजना सुरू करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठिय्या धरला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासबाब म्हणून टंचाईमधून 56 लाख रुपयांचा तातडीचा निधी आ. कर्डिले यांना देवू केला.

निधीचे पैसे वीज मंडळाकडे वर्ग होताच वांबोरी पाईपलाईन योजना सुरू झाली. वीज बिलाची उर्वरीत रक्कम व यावर्षीचे चालू बिलाचा आकडा  70 लाखापर्यंत असल्याने सर्व लाभधारक शेतकर्‍यांना ही योजना यापुढे चालू ठेवायची असेल तर मुख्य पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न न करता पाणीपट्टी भरली पाहिजे, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. मोरे यांनी केले आहे.
 मुळा धरणावरील बाराशे हॉर्स पॉवरच्या तीनही इलेक्ट्रॉनिक मोटारी सुरू केल्या असल्याने पाणी पाथर्डीपर्यंत पोहचले आहे.

वांबोरीच्या शेतकर्‍यांनी दहा लाख तर शिराळ, भोसे, जोहारवाडी आठरे कौडगाव येथील शेतकर्‍यांनी जवळपास दोन लाख रुपये पाणीपट्टी भरण्यासाठी गोळा केले आहेत. राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यातील तलावांमध्ये प्रामुख्याने पूर्ण दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.