होमपेज › Ahamadnagar › लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशिनही उपलब्ध होणार

जिल्ह्यासाठी येणार नवीन ‘ईव्हीएम’!

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:49PMनगर : प्रतिनिधी

ईव्हीएम मशीनवर घेण्यात येणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये सातत्याने निवडणूक आयोगाकडे मशीन खराब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता निवडणूक आयोगाने आता नवीन ईव्हीएम मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याला आठ हजार बॅलेट युनिट व चार हजार कंट्रोल युनिट मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अत्याधुनिक ईव्हीएम मशिन अर्थात मतदान यंत्रे मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या अत्याधुनिक यंत्राला व्हीव्हीपॅट मशिन जोडता येणार आहे. या व्हीव्हीपॅटमुळे कोणत्या उमेदवाराला मत दिले हे उमेदवाराला चिठ्ठीद्वारे दिसणार आहे. पुढील आठवड्यात ही मतदान यंत्रे बंगळुरू येथून नगरमध्ये दाखल होणार असून, त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणूक याच नवीन यंत्रांवर होणार आहे. तर महापालिकेची निवडणूक मात्र जुन्याच यंत्रांवर होईल.

जिल्ह्यात एकूण 3 हजार 599 मतदान केंद्रे आहे. या सर्व केंद्रांवर अत्याधुनिक मशिन उपलब्ध होणार आहे. नवीन मशीनमुळे लोकसभा निवडणुकीत पारदर्शकपणा येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ही मतदान यंत्रे देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यात नगर जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. टप्प्याटप्प्याने या मशिन जिल्ह्याला पुरविण्यात येणार आहे. मशिन बंगळुरू येथून पुढील आठवड्यात येणार आहे.

केडगाव, राहुरी विद्यापीठ येथील गोडाऊनमध्ये या मशिन पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे. एका कंट्रोल युनिटला एकाचवेळी 24 बॅलेट मशिन जोडता येत आहेत. पूर्वी केवळ चार बॅलेट युनिट बसविता येत होती. त्यामुळे एका मतदारसंघात साडेतीनशे पेक्षा उमेदवार रिंगणात राहिले, तरी हे एकच मशिन पुरेसे ठरणार आहे. नवीन मशिन जोडण्यासाठी सोपी आहेत. अत्याधुनिक मतदान यंत्रामुळे भविष्यात मतदान प्रक्रियेवर आरोप होणार नाहीत. नगर जिल्ह्यात लोकसभेसाठी नगर, शिर्डी असे दोन मतदार संघ असून, 32 लाखांहून अधिक मतदार आहे.