Thu, Nov 15, 2018 13:50होमपेज › Ahamadnagar › विकासकामांना ‘नगररचना’चाच आधार!

विकासकामांना ‘नगररचना’चाच आधार!

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेचे सन 2018-2019 या अर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती व महासभेतील दुरुस्त्या, सूचनांनंतर अखेर अंतिम झाले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या 619 कोटींच्या बजेटमध्ये ‘स्थायी’ने 12.41 कोटींची वाढ केल्यानंतर महासभेने 6.41 कोटींची वाढ केली आहे. त्यानुसार 637.80 कोटींचे अंदाजपत्रक प्रशासनाकडे सादर झाले असून आयुक्‍तांनी नोव्हेंबर अखेर 50 टक्के तरतुदी वापरण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, महासभेने विविध विकासकामे प्रस्तावित करतांना त्यासाठी ‘नगररचना’तील उत्पन्नातून रोख निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महासभेत झालेल्या चर्चेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महापौरांनी 50 लाखांची तरतूद केली आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने 10 कोटींच्या या कामापोटी पहिल्या टप्प्यातील कामाला मंजुरी देत महासभेने 5 कोटींची तरतूद केली आहे. त्यासाठी विकासभारच्या उत्पन्नातून मिळालेला भूसंपादनासाठीचा राखीव असलेला व आजतागायत अखर्चित असलेला निधी या कामासाठी वापरण्यासही महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. नगरसेवकांसाठी वॉर्ड विकास व स्वेच्छा निधीतून प्रत्येकी 15 लाखांची तरतूद करण्यात आली असून त्यातील देयके अनधिकृत बांधकामे नियमित करतांना मिळणार्‍या उत्पन्नातून अदा करण्याचा ठराव करण्यात आला आहे. 

नगरसेवक निधीसाठी रोख तरतूद झाल्यामुळे व या 100 टक्के तरतुदी वापरास आयुक्‍तांनी परवानगी दिल्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात कामे प्रस्तावित होणार आहेत. माळीवाडा येथील सौभाग्य सदनाचे नुतनीकरण करुन इनडोअर गेम्स व योगा केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी विकासभार निधीमधून 75 लाखांची रोख तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्थेच्या कामासाठी प्राधान्याने 5 लाख रुपये विकासभार मधून तर उर्वरीत कामांसाठी मनपा निधीतून तरतूद करण्यात आली आहे. अमरधाम स्मशानभूमीत पावसाळ्यात येणारी अडचण लक्षात घेऊन दहन ओट्यासमोर पत्र्याची शेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विकासभार मधून 45 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्‍त चटईक्षेत्र निर्देशांक प्रीमियमपोटी मिळणार्‍या उत्पन्नातून 4 कोटींची विकासकामे प्रस्तावित केली जाणार आहेत. मोबाईल टॉवर मधून मिळणार्‍या उत्पन्नातूनही सुमारे 2.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात नानापाटील वस्ताद तालीमसाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महिलांसाठी स्वच्छता गृहे उभारण्यासाठी तरतूद करतांनाच सदरचे काम तात्काळ हाती घ्यावे, असे आदेशही महासभेने दिले आहेत. कल्याण रोड परिसरात नगरसेविका उषा ठाणगे यांच्या मागणीनुसार आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडे निधी मागविण्यात आला आहे. तर श्रमिकनगर येथील व्यायामशाळेच्या जागेवर नगरसेवक मनोज दुलम यांच्या मागणीनुसार आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी विकासभारमधून 10 लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्‍न टीडीआर, भूसंपादनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासही सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

मूलभूत योजनेच्या 40 कोटींच्या कामांपैकी 2.06 कोटींची कामे रद्द करण्यात आली आहे. मुदत संपल्यामुळे यातील 1.03 कोटींचा अखर्चित निधी शासनाला परत केला जाणार असून 1.03 कोटींच्या स्वहिस्स्यातून प्रभाग 27 मध्ये 10 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. क्रीडा स्पर्धांसाठी प्रथम महापौर चषक - महापौर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 25 लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठीच्या खर्चात 50 लाखांनी वाढ करुन दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने महापौर शहर विकासनिधीसाठी केलेल्या 3 कोटींच्या तरतुदीमध्ये 2 कोटींची वाढ करुन 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केडगाव व बुरुडगाव परिसरात उद्यानांसाठी 30 लाखांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. सावेडी नाट्यसंकुलाचे काम मार्गी लावण्यासाठी स्वहिस्सा म्हणून 2.96 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून मिळणार्‍या विविध निधींमधून कामे प्रस्तावित करण्याचे अधिकार यंदाही महापौरांना देण्यात आले आहेत. तसा ठरावही करण्यात आला असून अंदाजपत्रक प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.

दरम्यान, आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत 50 टक्के तरतुदी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. नगरसेवक स्वेच्छा निधी 100 टक्के करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मनपा निधीतील कामे वसुलीचे प्रमाण पाहूनच अंदाजपत्रके तयार करावीत. तसेच प्रत्यक्ष पाहणी करुन गरज असल्यासच कामे प्रस्तावित करावीत, असे आदेशही आयुक्‍तांनी दिले आहेत.