Mon, Apr 22, 2019 03:50होमपेज › Ahamadnagar › युनियन बँकेचे ११ लाख लुटले

युनियन बँकेचे ११ लाख लुटले

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMनगर : प्रतिनिधी

युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या कारला धक्का लागल्याचा बहाणा करून दुचाकीस्वारांनी कारची काच फोडून 11 लाख रुपयांची रोकड लांबविली. शहरातील चांदणी चौकाजवळ मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली. या लुटीनंतर शहरात तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. मात्र, लुटारू पसार झाले.

पोलिसांनी सांगितले की, युनियन बँकेच्या निमगाव गांगर्डा शाखेत व्यवस्थापक म्हणून महेशकुमार सद‍्गुरु कात्रजकर (32, रा. सरदवाडी, ता. जामखेड, हल्ली रा. जामखेड-बीड रस्ता, शाहू कॉलनी, नगर) हे दीड वर्षांपासून काम करतात.

बँकेच्या निमगाव गांगर्डा शाखेत दैनंदिन कामकाजासाठी रोकड कमी होती. त्यामुळे सोमवारी कात्रजकर यांनी सावेडीचे शाखा व्यवस्थापक अच्युत देशमुख यांना फोन केला होता. देशमुख यांनी मंगळवारी सकाळी सावेडी शाखेत घेऊन रोकड घेऊन जाण्यास सांगितले. त्यावरून व्यवस्थापक कात्रजकर व शिपाई नाथू किसन गोरे हे दोघे स्विफ्ट डिझायर कारमधून 11 वाजता सावेडी शाखेत गेले. त्यांना 15 लाख रुपये हवे होते. परंतु, 11 लाख रुपयेच मिळाले. ती रक्कम कारमध्ये घेऊन ते साडेअकरा वाजता सावेडी शाखेतून निघाले. तेथून ते स्टेशन रस्त्यावरील शाखेत गेले. तेथे 5 लाख रुपये मागितले. परंतु, पैसे न मिळाल्याने ते पावणेबारा वाजता पुन्हा कारमधून निमगाव गांगर्डा शाखेकडे निघाले. 

कार चांदणी चौकातून त्यांनी कार सोलापूर रस्त्याकडे वळविली. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरटीओ कार्यालयाच्या जागेसमोरून जात असताना कारचा मोठ्याने आवाज आला. कोणीतरी धक्का दिला असेल, असे समजून कात्रजकर हे कारमधून खाली उतरले. त्यावेळी दुचाकीवरील दोनपैकी पाठीमागील बाजूस बसलेला व्यक्ती मोठ्याने ओरडत होता. कात्रजकर हे त्याच्याकडे जाऊन कोठे लागले आहे, असे विचारत असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेले इतर दोनजण कारजवळ गेले. एकाने कारची काच फोडून शिपाई गोरे याच्या गळ्याला धरून ढकलले व 11 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर दुचाकीवरून भरधाव वेगात दोघेही चांदणी चौकाकडे निघून गेले. 

याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात शाखा व्यवस्थापक महेशकुमार कात्रजकर यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.