Mon, May 27, 2019 01:07होमपेज › Ahamadnagar › बेरोजगारांना लाखोंचा गंडा

बेरोजगारांना लाखोंचा गंडा

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 10:23PMनगर : प्रतिनिधी

प्रांताधिकारी कार्यालयात लिपिक पदाचे आमिष दाखवून 21 बेरोजगार युवकांना लाखो रुपयांना गंडविणार्‍या ग्रामपंचायत सदस्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सदर उमेदवारांना प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकार्‍यांचे बनावट शिक्क्यानिशी नियुक्तीपत्रे दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट 2017 ते 9 फेब्रुवारी 2018 दरम्यान हा प्रकार घडला होता. 

अटक केलेला आरोपी पांडुरंग नारायण कळमकर (रा. खातगाव टाकळी, ता. नगर) हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याबाबत बाबासाहेब संजय जाधव (रा. शिंगवे नाईक, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कळमकर हा बेरोजगार तरुणांना प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर भाग येथे लिपिक पदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. तुम्हाला नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर सव्वालाख रुपये द्या, असे त्याच्याकडून सांगितले जात होते. त्यानुसार बाबासाहेब जाधव यांनी प्रांताधिकार्‍यांच्या नावाने अर्ज करून तो कळमकर याच्याकडे दिला. उपविभागीय कार्यालयात नियुक्ती झाल्याचे पत्र प्रांताधिकार्‍यांच्या सही, शिक्क्यानिशी जाधव यांना 11 जानेवारी 2018 रोजी बंद खाकी पाकिटात पोस्टाने प्राप्‍त झाले. 9 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात नियुक्तीसाठी बोलविले होते. नियुक्तीपत्र आल्यानंतर जाधव यांनी कळमकर यांच्याशी संपर्क साधला. नियुक्ती झाल्याचे समजून जाधव यांनी एमआयडीसी परिसरात कळमकर याला सव्वालाख रुपये दिले.

9 फेब्रुवारी रोजी बाबासाहेब जाधव हे प्रांताधिकारी तथा उपविभागीय कार्यालय, नगर भाग येथे मूळ कागदपत्रांसह गेले. त्यावेळी त्यांच्याकडे शिक्क्यानिशी असलेले नियुक्तीपत्र बोगस असल्याचे आढळून आले. कळमकर याने जाधव यांच्यासह इतर 20 बेरोजगारांचीही फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याने आतापर्यंत तब्बल 21 बेरोजगारांना त्याने लाखो रुपयांना गंडविल्याचे स्पष्ट झाले आहे. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पांडुरंग कळमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटकेची कार्यवाही केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करीत आहेत.

पांडुरंग कळमकर याने 21 जणांना फसविल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत स्पष्ट झालेले आहे. त्यांनी पोलिसांशी संपर्क केलेला आहे. आणखी कोणत्या बेरोजगार युवकास फसविल्याचे असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि विनोद चव्हाण यांनी केले आहे.