Sun, Aug 25, 2019 12:55होमपेज › Ahamadnagar › कुणी नोकरी देता का...नोकरी! 

कुणी नोकरी देता का...नोकरी! 

Published On: Aug 28 2018 1:18AM | Last Updated: Aug 27 2018 10:41PMश्रीरामपूर : गोरक्षनाथ शेजूळ

राज्यासह देशात कोट्यवधी रोजगार उपलब्ध केल्याची छाती बडविली जात असली तरी, नगर जिल्ह्यात मात्र दररोज नोकरीची मागणी करणार्‍या 49 पैकी केवळ एकाच तरुणाला नोकरी मिळत असून, उर्वरित 48 तरुण बेरोजगार बनत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.   

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वीचे ‘एम्प्लायमेंट’ तथा आजचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय आहे. येथे  हजारो सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, मध्यंतरी विविध कंपन्यांवरील निर्बंध, कॉस्ट कटींग, नोकर भरती बंदीमुळे नवीन नोकर भरती झाली नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 

नगर जिल्ह्यात सन 2015, 2016 व 2017 या तीन वर्षांत तब्बल 54 हजार 522 सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरी मिळावी, यासाठी या केंद्राकडे ऑनलाईन नोंदणी केली होती. तीन वर्षांत त्यापैकी 21 हजार 596 तरुणांनाच रोजगार प्राप्त झाला आहे. तर 32 हजार 926 तरुणांना रोजगार मिळू शकलेला नाही. 

जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये 17 हजार 193 तरुणांनी नोंदणी केली होती. मात्र, वर्षभरात केवळ 698 तरुणांना नोकरी मिळाली. तर 16 हजार 495 तरुणांना या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळू शकला नाही. पुढे जानेवारी ते डिसेंबर 2016 या वर्षात नोंदणी करणार्‍यांची संख्या वाढून 19 हजार 394 तरुणांनी नोकरी मिळावी, यासाठी या केंद्रात नोंदणी केली होती. त्यात पूर्वीचेही 16 हजार बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत होतेच. त्यामुळे 35 हजार 889 तरुण बेरोजगार बनले होते. यापैकी 20 हजार 533 तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. तर  15 हजार तरुण नोकरीची प्रतीक्षेत कायम राहिले. 

गेल्यावर्षी 2017 मध्ये या केंद्रात 17 हजार 935 तरूणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. मात्र, नोकर भरती नसल्याने या वर्षात केवळ 365 तरूणांनाच नोकरी मिळू शकली. तर 17 हजार 570 तरूणांना कोणताही रोजगार मिळाला नाही. विशेष म्हणजे, यामध्ये 10 वी, 12 वी तरूणांबरोबरच बी.ए., एम.ए., तसेच बीएड आणि आयटीआय, अभियंत्यांनाही कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. 

वास्तविकतः जिल्ह्यात दररोज सरासरी 49 सुशिक्षित तरूण बेरोजगार बनून नोकरीची मागणी करत आहेत. दररोज वाढणारी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही मनाला सुन्न करणारी आहे. त्यातच ही आकडेवारी केवळ एम्पलॉयमेंट कार्यालयात नोंदणी केलेल्यांची आहे. या व्यतिरिक्तही सुशिक्षित बेकारांची संख्या निश्‍चितच अधिक आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी बेरोजगारी हटाव कार्यक्रम हाती घेऊन शिर्डीचे साईसंस्थान, शनिशिंगणापूर देवस्थान, सहकारी साखर कारखाने यांसह अन्य छोट्या-मोठ्या खासगी प्रकल्पांमध्ये या सुशिक्षित तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच खासगी कंपन्यांनाही नोंदणी केलेल्या गरजू तरूणांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यासाठी तसे निर्बंध घालणे गरजेचे आहे. या बेरोजगार तरूणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही, तोपर्यंत त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने अशा तरूणांना दरमहा 5 हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याची मागणी जिल्ह्यातून होेत आहे.