Thu, May 23, 2019 14:47
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › पाणी योजनेवर अनधिकृत नळजोड?

पाणी योजनेवर अनधिकृत नळजोड?

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 12:23AMकोपरगाव : प्रतिनिधी

नगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या 42 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या वाहिनीवर शहरात संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून विविध प्रभागात बेकायदेशीर नळ जोडण्या दिल्या जात आहे. याबाबतची शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून पाणी पुरवठा विभागाला अभियंताच नसल्याने हे सर्व बेकायदेशीर कृत्य चालले आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून 42 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे काम शहरात सध्या मंदगतीने सुरू आहे. ही योजना किती टक्के पूर्ण झाली याची माहितीच पालिकेत उपलब्ध नाही. काही महिन्यांपूर्वी येथे असलेले पाणी पुरवठा अभियंता लोखंडे हे लाच घेताना पकडले गेले होते. त्या आधीपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचा कारभार राम भरोसे पद्धतीने सुरू आहे. पालिकेच्या या आधीच्या कारभारातही असे बेकायदा जोड घेतले गेलेले आहेत. 

माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेचे अधिकृत नळ जोडणी किती याबाबतची माहिती मागवली असता त्या संबंधिताना पालिकेच्यावतीने 700 ते 800 नळ बेकायदा जोडणी असल्याचे आकडेवारीनिशी दिले आहे. त्यात काही माजी नगराध्यक्ष पासून नगरसेवक, स्वतःला बडे म्हणविणारे नेते यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हे बेकायदा नळ गेल्या काही वर्षापासून तोडण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याला पालिकेच्यावतीने वाटण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. शहरात येणार्‍या मुख्य जलवाहिनीवरील काही महाभागांचे नळ चोवीस तास सुरू आहेत तर काही प्रभागात जेमतेम दहा ते पंधरा मिनिट पाणीपुरवठा होतो.

तर काही प्रभागात साडेतीन तास पाणी चालते. पाण्याची मागणी करूनही नागरिकांना स्वच्छ व चांगले पाणी मिळत नाही. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी दररोज होते त्याकडे मात्र सर्वच कानाडोळा करतात. आ. स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन हे फुटलेले वाहिन्या दुरुस्त करण्याच्या आदेश देऊनही त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे शहरात वाढत चालाल्लेल्या बेकायदा नळ जोडणीचा रितसर सर्व्हे कधी होणार व त्याबाबतची खरे सत्य कधी बाहेर येणार याची उत्सुकता कायम आहे. शहरात सध्या नळ जोड देताना अक्षरशः दमदाट्या करून नळ जोड घेतले जात आहे. त्यातही ते अर्धा इंची असले तर त्यापेक्षा जास्त इंची घेतले जात आहेत. पालिकेचा अधिकारी समक्ष नसल्याने हे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.