Fri, Apr 26, 2019 04:09होमपेज › Ahamadnagar › अनधिकृत खासगी परीक्षा सुरूच

अनधिकृत खासगी परीक्षा सुरूच

Published On: Mar 13 2018 1:40AM | Last Updated: Mar 13 2018 1:40AMनगर : प्रतिनिधी

शाळेतील अंतर्गत परीक्षा वगळता खाजगी संस्थेच्या परीक्षा शाळांमध्ये घेण्यास बंदी असतांना जिल्ह्यात सर्रासपणे खाजगी संस्थांमार्फत परीक्षा घेण्यात येत आहेत. प्रज्ञाशोध व इतर परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थी, पालकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरु आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात घेण्यात आलेल्या एका परीक्षेत प्रश्नपत्रिका न पोहोचल्याने गोंधळ उडाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर जागे झालेल्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल मागितला आहे.

विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्यासाठी ‘टॅलेंट सर्च’च्या नावावर विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत वयाने लहान असलेल्या मुलांना महापुरुषांविषयी संभ्रम निर्माण करणारे प्रश्न विचारण्यात आले होते. आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचे लक्षात आल्यावर एका संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत येत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले होते.  नुकतेच श्रीरामपूरला झालेला प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना विचारणा केली आहे.

या प्रकारापासून शहाणे होण्याची गरज असतांना शिक्षण विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. शिक्षण विभागाने अनेकदा परिपत्रक काढून शाळांना खाजगी परीक्षा न घेण्यास बजावले आहे. मात्र शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांच्या तोंडी परवानगीने खाजगी परीक्षा घेण्यास पाठबळ मिळत असून, यामागे मोठे आर्थिक रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खाजगी परीक्षेचे आयोजन करण्यासाठी खाजगी संस्थांमार्फत कमिशन एजंटची नेमणूक करण्यात येते. खाजगी परीक्षा घेणार्‍या संस्थेकडून परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याला 150 ते 200 रुपये शुल्क आकारण्यात येते. परीक्षेला बसल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी 300 ते 500 रुपयांपर्यंत किंमत असलेली संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना विकत घ्यावी लागतात. ही संदर्भ पुस्तके पुरविण्याचे कामही संबंधित खाजगी संस्थेमार्फतच करण्यात येते. अनधिकृत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणार्‍या शुल्कातील 20 टक्के रक्कम शिक्षकांना तर 200 ते 300 रुपये हे संबंधित प्रतिनिधीला देण्यात येतात.

इतक्या मोठ्या प्रमाणावर शुल्क घेण्यात येत असतांना परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मात्र नाममात्र स्वरूपाची देण्यात येतात. कोट्यवधी रुपयांचे या माध्यमातून होत असतांना या खाजगी संस्थांना ना कुठला जीएसटी, ना कुठला कर, ना कुठला हिशेब. त्यामुळे दिवसेंदिवस या संस्थांचे फावतच चालले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्याची पद्धत बंद करण्यात आली. मात्र खाजगी संस्थांकडून याचे सर्रास उल्लंघन करण्यात येते. जी. के. ऑलिम्पियाड, मंथन प्रज्ञाशोध, सावित्री प्रज्ञाशोध या काही अनधिकृत परीक्षांची नावे आहेत. सद्यस्थितीत राहुरी, नगर शहर, पारनेर, श्रीरामपूर यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यात परीक्षा घेण्याचे काम सुरु आहे.