होमपेज › Ahamadnagar › राज्य सरकार निकम्मे; आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल : उध्दव ठाकरे

राज्य सरकार निकम्मे; आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल : उध्दव ठाकरे

Published On: Apr 25 2018 1:04PM | Last Updated: Apr 25 2018 1:22PMनगर : प्रतिनिधी 

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री विकासकामात व्यस्त आहेत. माता भगिनींचा आक्रोश त्यांना दिसत नाही. त्यामुळे राज्यात स्वतंत्र गृहमंत्री असलाच पाहिजे. केडगाव हत्याकांडातील आरोपींसह त्यांना सुपारी देणारे सूत्रधार सत्ताधारी असो किंवा कोणत्याही पक्षाचे असो ते फासावर लटकलेच पाहिजेत. राज्य सरकार निकम्मे आहे त्यामुळे आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल असे उध्दव ठाकरे म्हणाले.

तपासासाठी कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती करावी. शिवसैनिकांनी अद्याप हात उचलेला नाही. परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तेही करू, अशा शब्दात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला.

नगर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुंडाना पक्षात घेऊन वाल्मिकींचा अपमान भाजपने करू नये. सध्या बिहारची अवस्था सुधारली आणि राज्याचा बिहार झालाय. अशा स्थितीत आमच्या मंत्र्यांनी अधिकार वापरले तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये. आमच्यावर हात उचलायची वेळ आली तर शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करू नका, असे सांगत भाजप सरकार मोगलाई पोसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मयत शिवसैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगतात. त्यांना सगळे माहिती आहे तर त्यांनी नाते-गोते सर्व काही बाजूला ठेवून पुढे यावे व साक्ष द्यावी, असे आव्हानही ठाकरे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले.

Tags : Uddhav Thackeray, Shivsena, BJP, State, Government, Maharashtra, Ahamadnagar