Thu, May 23, 2019 15:07
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › राज्यातील सरकार निकम्मे!

राज्यातील सरकार निकम्मे!

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:28AMनगर : प्रतिनिधी

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. केडगाव हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. मुख्यमंत्री विकासकामांत व्यस्त असल्याने माता-भगिनींचा आक्रोश त्यांना दिसत नाही. त्यामुळे राज्यात स्वतंत्र गृहमंत्री असलाच पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. त्यातच आमचे मंत्री अधिकार वापरत असतील तर त्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये अन्यथा हे सरकार ‘निकम्मे’ आहे, असेच म्हणाले लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला. राज्यातील विदारक परिस्थिती वाढत गेल्यास आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांनी काल (दि. 25) केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेनेच्या वतीने दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी 22.50 लाख अशी सुमारे 45 लाखांची मदत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, केडगाव हत्याकांडाचा तपास करणारी यंत्रणा दबावाखाली आहे. कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकार्‍याची तपासी अधिकारी म्हणून नेमणूक करायला हवी.

सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी, अशी मागणी मी केलेली आहे. हत्याकांडाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हावा. हल्लेखोरांसह त्यांना सुपारी देणार्‍या मूळ सूत्रधारांना ते कोणत्याही पक्षाचे असले तरी फासावर लटकावे, अशी मागणी त्यांनी केली. हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्‍त केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, पोलिस ठाण्यावर हल्ला करून आरोपीला पळवून नेणार्‍या आमदार कर्डिले यांना मात्र ज्या गांभीर्याने अटक व्हायला हवी होती ती झाली नाही. अटक झाली मात्र, ते काल जामिनावर सुटले, अशा शब्दांत त्यांनी पोलिस प्रशासनावरही ताशेरे ओढले.

छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्यांनी अधिकाराचा वापर करून या गुंडगिरीचा बीमोड करावा. शिवरायांचा अपमान करणारा छिंदम, वीर सैनिक व त्यांच्या पत्नीचा अपमान करणारा परिचारक अशा गुंडांना पक्षात घेऊन वाल्मीकींचा अपमान भाजपने करू नये. सध्या नितीश कुमार यांनी बिहारची अवस्था सुधारली आहे. मात्र, महाराष्ट्राचा बिहार झालाय का? असे वाटायला लागलेय. 

अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे अधिकार वापरावेत. नाही तर आमच्या मंत्र्यांनी अधिकार वापरले, तर त्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा हे सरकार ‘निकम्मे’ आहे, असेच म्हणाले लागेल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

राज्यात शिवसैनिकांच्या हत्येच्या घटनांवरून शिवसेनेची दहशत कमी झाल्याची व स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर अशा घटना झाल्याच नसत्या, अशी चर्चा असल्याकडे पत्रकारांनी ठाकरे यांचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले की, आम्ही आधी विनंती करतोय. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अधिकार वापरुन परिस्थिती नियंत्रणात आणावी. शिवसैनिकांना ठोक म्हटलं की ते ठोकतात. त्यानंतर मग जे वातावरण निर्माण होईल, ते शांत होईपर्यंत त्यांना कोणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करू नये. सरकारचे निकम्मेपण वाढत गेलं, तर आम्हाला ही भूमिका घ्यावी लागेल. शिवसैनिकांचा हात अजून उठलेला नाही.

स्वत:हून कोणावर हात उगारू नका, पण कोणी जर अंगावर हात उगारला, तर तो जागेवर ठेवू नका, या शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीच्या अंमलबजावणीची सुरुवात जर आम्ही केली, तर जे नामर्द हल्लेखोर आहेत, ज्यांनी एकट्या दुकट्याला गाठून गोळ्या घालून, गळा चिरून हत्या केली, या नामर्दांच्या अवलादीला महाराष्ट्रामध्ये ठेचून टाकू, असा सज्जड इशारा ठाकरे यांनी दिला. दरम्यान, राज्यातील परिस्थिती पाहता भाजपने मोगलाई पोसली असल्याचा घाणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेस ना. एकनाथ शिंदे, ना. रामदास कदम, ना. दिपक केसरकर, ना. विजय शिवतारे, शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, खा. सदाशिव लोखंडे, खा. विनायक राऊत, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, भाऊ कोरगांवकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राधाकृष्ण विखेंनी कोर्टात साक्ष द्यावी!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही हत्या राजकीय नसून, वैयक्‍तिक वादातून झाल्याचे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता, ठाकरे म्हणाले की, विखे पाटलांना जर याबाबत माहिती असेल, तर त्यांनी पुढे यावे. कोर्टात साक्ष द्यावी. त्यांच्याकडे जर पूर्ण माहिती असेल, तर त्यांनी नाती-गोती सोडून कणखरपणे उभे राहून साक्ष द्यावी, असे आव्हान त्यांनी विखे पाटील यांना दिले.