Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Ahamadnagar › गोदावरी नदीपात्रात दोन विद्यार्थी बुडाले

गोदावरी नदीपात्रात दोन विद्यार्थी बुडाले

Published On: Aug 28 2018 1:18AM | Last Updated: Aug 27 2018 10:45PMपुणतांबा : वार्ताहर

पुणतांब्याजवळील बापतारा (ता. वैजापूर) येथील 2 शालेय विद्यार्थी गोदावरी नदीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी 7 वा. घडली. बुडालेल्या या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरूच होते.

बापतारा येथील विवेक कालिचरण कुमावत (14), तुषार सतीश गांगड (14) व सार्थक एकनाथ भवार हे तिघे मित्र सकाळी सात वाजता आंघोळीसाठी गोदावरी नदी काठावर गेलेे होते. यापैकी विवेक व तुषार हे दोघे नदीपात्रात उतरले. मात्र, त्यांना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले. आपले दोन मित्र पाण्यात बुडताना पाहून सार्थकने आरडाओरडा केला.  घाबरलेल्या अवस्थेतच आपले दोघे मित्र पाण्यात बुडाल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना  दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेऊन विवेक व तुषारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

नदीपात्रात पट्टेदार पोहणार्‍यांनी त्या दोघांचा शोध घेतला. मात्र, त्यात यश आले नाही. नदीपात्रात दोन मुले बुडाल्याची माहिती वैजापूरचे तहसीलदार, विरगांव पोलिस ठाण्यात  देण्यात आली. प्रांताधिकारी सानप यांनी मुलांचा शोध घेण्यासाठी अग्‍निशामक व महसूलच्या पथकाला पाचारण केले. त्यानंतर अग्‍निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहचले. त्या पथकाने सकाळी 9 वाजल्यापासून मुलांची शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी आठ तासांनतरही  शोध मोहीम सुरूच होती. 

बापतारा येथील सरपंच मनिषा लक्ष्मण मुकिंद, पोलिस पाटील राजश्री  गायकवाड, लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकणे, केशव मोरे, धनंजय धोर्डे, प्रभाकर गाडेकर, दत्ता धुमाळ यांच्यासह ग्रामस्थांकडूनही शोध मोहिमेस सहकार्य केले जात आहे. जि. प. सदस्य पंकज ठोंबरे, जि. प. सदस्य प्रा. रमेश बोरणारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, राष्ट्रवादीचे अजय चिकटगांवकर, शिवसेनेचे बाबासाहेब जगताप आदींनी बापतारा येथे येऊन घटनास्थळी भेट दिली.

विवेक कुमावत व तुषार गांगड हे दोघेही जिवलग मित्र होते. इयत्ता आठवीत पुणतांबा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षण घेत होते. घटनेनंतर शाळा दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.