Wed, Jun 26, 2019 11:54होमपेज › Ahamadnagar › नगरः जामखेडमध्ये गोळ्या झाडून दोघांची हत्या

नगरः जामखेडमध्ये गोळ्या झाडून दोघांची हत्या

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 29 2018 7:56AMजामखेड : प्रतिनिधी

जामखेड-बीड रस्त्यावरील वामनभाऊ ट्रेडर्स या दुकानासमोर दुचाक्यांवरुन तोंडे बांधून आलेल्या तिघा मारेकर्‍यांनी बेधुंद गोळीबार करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश अंबादास राळेभात (वय 30) व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय 24) या दोघांची निघृण हत्या केली. 

ही घटना काल (दि. 28) सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जामखेडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, आरोपींना अटक होईपर्यंत जामखेड बंदचा इशारा माजी जि. प. सदस्य व राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात यांनी दिला आहे. 

या हल्ल्यात योगेश यांच्या खांद्यावर एक व छातीत एक अशा 2 गोळ्या लागल्या, तर राकेश यांच्या कमरेवर एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती होती. मारेकरी गोळीबार करुन तत्क्षणीच दुचाक्यांवरुन पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना तेथे तब्बल 8 काडतुसे आढळून आली. हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यांचा वापर केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोळीबारात जखमी झालेले योगेश व राकेश हे दोघेही एका जागेवर पडून होते. पोलिस घटनास्थळी येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी धावपळ करीत त्यांना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, वैद्यकिय अधिकारी नसल्याने त्यांना अर्धा तास कोणतेही उपचार मिळाले नाही. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे त्यांच्या खर्डा चौकातील दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालयात आले. त्यांनी प्राथमिक उपचार केले. तेथून दोन्ही जखमींना नगरला हलविण्यात आले.  यावेळी संतप्त जमावाने डॉ. लामतुरे यांना दवाखाण्यात येण्यास उशिर झाल्याचा जाब विचारला. तेव्हा मोबाईल बंद होता, असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारुन नेली.

घटनेची माहिती समजताच जमादार राहुल हिंगसे व विजय कोळी घटनास्थळी आले. तेथून ते दवाखान्यात गेले. याच दरम्यान पालकमंत्री राम शिंदे हे खाजगी कार्यक्रमासाठी जामखेड येथील श्रीराम मंदिरात आले होते. तेथे उपस्थित पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. पोलिस निरीक्षक नितीन पगार रजेवर आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण आहे. 

जामखेड-नगर रस्त्यावर तीन महिन्यांपूर्वी एका डॉक्टरवर व मेडिकल दुकान चालकावर भरदिवसा गोळीबार झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज गजबजलेल्या जामखेड-बीड महामार्गावर गोळीबार होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन्ही मयतांच्या मृतदेहांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरिय तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Tags : ahamadnagar news, Jamkhed , crime, murder, ncp