Thu, Aug 22, 2019 11:00होमपेज › Ahamadnagar › ट्रक व लक्झरीच्या धडकेत दोनजण ठार

ट्रक व लक्झरीच्या धडकेत दोनजण ठार

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:54AMजामखेड : प्रतिनिधी

जामखेड-खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा येथे ट्रक व लक्झरी बसची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमीवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील चारजण जामखेड येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत असून, इतर गंभीर जखमींना नगर येथे हलविण्यात आले आहे. 

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.1) पहाटे चारच्या सुमारास पाऊस चालू होता. यावेळी हैदराबादकडून शिर्डीकडे साईबाबा दर्शनासाठी भाविकांना घेऊन जात असलेली एस. व्ही. आर. कंपनीची लक्झरी बस(क्र.पी 35-यू 5555) येत होती. तर जामखेडकडून खर्डाकडे कांद्याने भरलेला ट्रक ( क्र. टीएस 05-यूसी 2549)  जात होता. काटेवाडी शिवारात शिऊर फाटा येथे या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात लक्झरी बसमधील के.मोहन रेड्डी (62, रा. हैदराबाद) व चालक राजेश आर. रिंगोजी (45, रा. गौतमनगर, हैदराबाद) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात टी. व्ही. राव (50, विजयवाडा), विनोद कुमार (30), नारायन  यन्नु (45), पी. अहमद (50), जितेंद्र कुमार (38), मधुसूदन ए. रेड्डी (46), सुनिता पी.(40), शेख लतिफ (35), खलील  शेख (45, सर्व रा.हैदराबाद) हे जखमी झाले आहेत. जामखेड, नान्नज, खर्डा या तीनही  ठिकाणाहून आलेल्या 108 रुग्णवाहिकांनी जखमींना जामखेड येथे आणण्यात आले. सर्व जखमींवर जिल्हा ग्रामीण रुणालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज  खराडे यानी प्राथमिक  उपचार केले. यातील काहींना जामखेड येथील खासगी दवाखान्यात तर गंभीर जखमींना नगरला पाठविण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच काटेवाडी शिवारात राहत असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास मासाळ हेे आशिष मासाळ, संजय बहीर, विनोद बहीर, महेश येवले, युवराज जगदाळे, शिवाजी येवले, बाळू येवले, गणेश देवकाते, महेश अडाले, सागर साबळे यांच्यासह घटनास्थळी आले. काटेवाडी गावातील तरूणही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला असता ते तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आले. याच सुमारास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पगार व त्यांचे सहकारीही अपघातस्थळी आले. त्यांनीही दोन्ही वाहनांतील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.