Fri, Feb 22, 2019 15:54होमपेज › Ahamadnagar › भूमी अभिलेखचे २ कर्मचारी चतुर्भुज

भूमी अभिलेखचे २ कर्मचारी चतुर्भुज

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 26 2018 1:23AMराहुरी : प्रतिनिधी

राहुरीत भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचार्‍यांना 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकानेे गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

वैभव प्रकाश बिज्जा (निमताणदार) व  सत्यम धनराज थोरवे (शिपाई) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराच्या पूर्वीच्या सर्व्हे नंबरचे गट नंबर एकत्रीकरण झाले असताना, जमिनीवर कमी क्षेत्राची नोंदणी झालेली होती. त्याबाबत या तक्रारदाराने नाशिक येथे पाठपुरावा करून, सर्व दस्त नोंदीसाठी राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात दिले होते. 

त्यावेळी बिज्जा व थोरवे या दोघांनी ही नोंद करण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली. त्याने 4 हजार रुपयांवर तडजोड केली. त्याने गुरुवारी पैसे देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर त्याने लाचलुचपत विभागाच्या नगर कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयातील पोर्चमध्ये दुपारी बिज्जा याला 4 हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.

पथकात पोलिस निरीक्षक श्याम पवरे, हवालदार नितीन दराडे, सुनील पवार, एकनाथ आव्हाड, तनवीर शेख, दत्तात्रय बेरड, प्रशांत जाधव, राधा खेमनर, चालक अंबादास हुलगे आदींनी आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने बिज्जा व थोरवे या दोघांना ताब्यात घेतले.