Fri, Mar 22, 2019 02:15
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › गोळीबारप्रकरणी २ अटकेत

गोळीबारप्रकरणी २ अटकेत

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 12:05AMजामखेड : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनी भल्या पहाटे जामखेड शहरात एसटी बस वाहकावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन आजबे व राजेंद्र काटे यांना जामखेड पोलिसांनी पनवेल येथून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत तिघांना अटक केली आहे.   

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 15 ऑगस्ट रोजी जामखेड एसटी आगाराचे वाहक सुग्रीव गहिनाथ जायभाय (वय 43, रा. लोकमान्य शाळेशेजारी जामखेड) हे घरी असताना रात्री सचिन आजबे याचा दूरध्वनी आला. त्याने सुग्रीव जायभाये यांना नगररस्त्यावरील ढाब्यावर बोलावले. त्यानुसार जायभाय तेथे गेले. तेथे सचिन आजबेसह इतर अनोळखी चारजण होते. यावेळी आजबे याने जायभाय यास उसने दिलेले पैसे का देत नाहीस, असे म्हणाला.

जायभाय यांनी वडील आजारी आहे. नंतर देतो म्हणालो. त्यानंतर ते सर्वजण रात्री दीडच्या सुमारास शहराकडे निघाले.यावेळी आजबे व इतर अनोळखी चौखांनी जायभाय यांना मारहाण केली. तसेच आजबे याने पिस्तूलातून झाडलेली गोळी जायभाये यांच्या मांडीतून आरपार गेली. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले. जायभाय यांनी मेव्हणे संदीप सांगळे यास दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यानंतर जायभाये यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन आजबे व इतर चौघांवर गुन्हा दाखल केला होता.दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी राणी संजय ढेपे (वय 28, रा. महारुळी, ता. जामखेड, हल्ली रा. मुंजोबा गल्ली, जामखेड) या महिलेस अटक केली होती. पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी ढेपे हिला अटक केली होती. 

या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सचिन दत्तू आजबे व राजेंद्र लक्ष्मण काटे हे पनवेल (मुंबई) येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. हे. कॉ. राहुल सपट, पो. कॉ. गणेश साने, गणेश गाडे यांच्या पथकाने शनिवारी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.