Sun, Apr 21, 2019 00:23होमपेज › Ahamadnagar › तिसगावच्या आठवडे बाजारासाठी 25 लाख

तिसगावच्या आठवडे बाजारासाठी 25 लाख

Published On: Jan 31 2018 11:48PM | Last Updated: Jan 31 2018 11:34PM करंजी :  वार्ताहर 

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आठवडे बाजारचे ग्रहण सुटणार असून, बाजाराच्या सुशोभीकरणासाठी कृषी व पणन महामंडळाकडून पंचवीस लाख रुपयांचा निधी मिळाला असून, येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी दिली.

परदेशी म्हणाले, तिसगाव आठवडे बाजारसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला भाजी विक्रेते भाजीपाला घेऊन बसतात. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी खा. दिलीप गांधी, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिका राजळे, जि.प.चे माजी सदस्य सोमनाथ खेडकर यांच्या प्रयत्नातून बाजारच्या देखभाल दुरुस्तीसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या कामास येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. अकरा फूट लांब, चार फूट रुंदीचे दहा ओटे बांधले जाणार असून, परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत. ड्रेनेज लाईनही टाकण्यात येणार आहे. या परिसरात वृक्षारोपण करून बाजारतळाची रंगरंगोटी केली जाणार आहे. बाजारतळ दुरुस्ती निधीसाठी जिल्हा परिषद सदस्या संध्याताई आठरे, सरपंच काशिनाथ लवांडे यांचे सहकार्य लाभल्याचेही परदेशी यांनी सांगितले.