Wed, Jan 22, 2020 13:37होमपेज › Ahamadnagar › सरकारी कामकाज ठप्प, शाळांनाही सुटीच

सरकारी कामकाज ठप्प, शाळांनाही सुटीच

Published On: Sep 10 2019 1:18AM | Last Updated: Sep 10 2019 12:31AM

नगर ः विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत निदर्शने करतांना शासकीय, निमशासकीय कर्मचारी.नगर : प्रतिनिधी
राज्य शासकीय - निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य समन्वय समितीने लाक्षणिक संप पुकारला होता. संपामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील सरकारी कामकाज दिवसभर ठप्प होते. जिल्ह्यातील बारा हजार शिक्षक व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील 12 हजार 150 कर्मचारी संपावर होते. शिक्षक संपात सहभागी झाल्याने प्राथमिक शाळांना अघोषित सुट्टीच मिळाली. तसेच आरोग्य यंत्रणाही ढेपाळली होती.

जिल्ह्यातील 85 माध्यमिक शाळांमधील 1 हजार शिक्षकांनी संपात सहभाग नोंदविला. त्या शाळांचे कामकाज बंद होते. संपामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली नसल्याने विद्यार्थी व पालकांची धावपळ उडाली. नगर शहरातील बहुतांश शाळा सुरु होत्या. तर ग्रामीण भागात प्राथमिक शाळांचे 11 हजार शिक्षक संपावर असल्याने शाळांना अघोषित सुट्टीच होती. कर्मचारी व शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेत निदर्शने करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांना निवेदन दिले.

जिल्हा परीषदेतील बांधकाम, शिक्षण विभाग, आरोग्य, लेखा, लिपिक वर्गीय कर्मचारी, जिल्हयातील प्राथमिक शाळातील सर्व शिक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व संस्था कर्मचारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक  व सर्व विस्तार अधिकारी संपात सहभागी झाले होते.

संपामध्ये जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, जि.प. कर्मचारी युनियन 4340, जि .प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना 615, जि.प. लेखा कर्मचारी संघटना, जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, शासकीय निमशासकीय लिपीक हक्क परिषद, प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, शिक्षक सेवा संघ, इंडीयन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा), एकल प्राथ . शिक्षक संघ, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघ, दिव्यांग कर्मचारी संघटना, पदवीधर महासंघ, ऊर्दू प्राथमिक शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघटना, विस्तार अधिकारी संघटना, मुख्याध्यापक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, अल्पसंख्यांक कर्मचारी संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.