Thu, Jul 18, 2019 02:59होमपेज › Ahamadnagar › नाफेडचे तूर खरेदी केंद्र पालकमंत्र्यांनी केले बंद!

नाफेडचे तूर खरेदी केंद्र पालकमंत्र्यांनी केले बंद!

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:49PMकर्जत : प्रतिनिधी

येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्र काल (दि.7) तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. त्यानंतर शेतकर्‍यांनी मालासह तहसील कार्यालय गाठले तेंव्हा;हा विषय आपल्या अखत्यारीत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनीच हे केंद्र जाणीवपूर्वक बंद केल्याचा आरोप जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व या खरेदी केद्रांचे प्रमुख विठ्ठल पिसाळ यांनी केला आहे. तडकाफडकी झालेल्या या निर्णयामुळे कर्जतमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात बोलताना अंबादास पिसाळ म्हणाले की, नगर येथील पणन महामंडळाचे कार्यालयीन सहाय्यक अजित तनपुरे हे आपणास मदत करीत असल्याचा ठपका ठेवून त्यांचीही  सोलापूर येथे रात्रीतून बदली करण्यात आली .तालुक्यात नाफेडच्या वतीने बर्गेवाडी येथील गजानन विकास सेवा संस्था व मिरजगाव येथे चापडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेत हमी भाव केंद्रास परवानगी देण्यात आली होती. गजानन खरेदी केंद्राने 1 हजार 800 शेतकर्‍यांची नोंदणी केली. त्यानुसार 500 शेतकर्‍यांची सुमारे 8000 क्किंटल तूर खरेदी केला. असे असताना 6 मार्च रोजी जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांनी संस्थेस लेखी पत्र देवून तूर खरेदी केंद्र बंद करीत असल्याचे कळवले. तसेच ज्यांनी या केंद्रावर तूर खरेदी केली आहे, त्यांनी जवळच्या केंद्रावर तूर पाठवावी, अशा सुचनाही शेतकर्‍यांना दिल्या.

या केंद्राने मागील वर्षी देशात सर्वाधिक तूर खरेदी केली. त्याबद्दल संस्थेने राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. केंद्राचे उदघाटनही ना. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सुमारे 13 हजार शेतकर्‍यांची 1 लाख 18 क्किटंल तूर खरेदी केली. तसेच चालू वर्षी देखील 56 कोटी रुपयांचा उडीद खरेदी केला. केंद्राच्या विरोधात एकाही तक्रार नाही. उलट शेतकर्‍यांसाठी आम्ही लाखो रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली आहे.असे असतानाही पालकमंत्र्यांनी राजकीय आकस ठेवून आमचे केंद्र बंद केले, ही चांगली बाब नाही. त्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्या पेक्षा आमचे केंद्र बंद करण्यासाठी मोठी शक्ती वापरावी लागली. अधिकार्‍यांना धारेवर धरले. मात्र आमचे केंद्र नियमात होते, तरीही केवळ सत्ता त्यांची आहे म्हणून त्यांनी याचा वापर केला, हे योग्य नाही, असे पिसाळ म्हणाले.  

यावेळी केंद्र प्रमुख विठठल पिसाळ यांनी नाफेडचे सरव्यवस्थापक यांनी पाठविलेल्या पत्राची सत्यप्रत पत्रकारांना दिली.जिल्हा मार्केंटिग आधिकारी भारत पाटील यांना 6 मार्च रोजी (जा.नंबर तुर खरेदी /2017-18 /3850) रोजी पाठविलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,कर्जत येथील गजानन महाराज विकास सेवा संस्थेचे तुर खरेदी सुरू आहे. मा. पालकमंत्री अहमदनगर यांच्याकडे या बाबत झालेल्या मिटींगमध्ये त्यांनी गजानन सेवा संस्थेचे तूर खरेदीचे काम काढून घेण्याबाबत तोंडी निर्देश आपणास दिले आहेत. त्याचे संदर्भीय पत्र जा क्र जिमा अनगर/आकीखयो/2017 -1/904 हा आहे. पत्रातील या मजकुरामुळे केवळ राजकीय आकस ठेऊनच हे केंद्र बंद करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे विठ्ठल पिसाळ यांचे म्हणणे आहे.

हनूमंत आदिनाथ आटोळे, शिवाजी दगडू शेंडकर,शंकर गावडे, सतिष जंजीरे या सह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी या निर्णयाचा  निषेध केला आम्हाला माल देण्यासाठी जवळचे केंद्र देण्याची गरज होती.आता वाहतुक खर्च वाढला आहे. शिवाय पुन्हा नाव नोंदणीचा त्रास होणार. हे चांगले नाही झाले. आम्हाला मोबाईलवर नोंदणी आणि माल आणण्याचे मेसेज आले आहेत,असे शेतक-यांनी यावेळी पुढारीला सांगितले.